Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज

 राज्यात १७ आणि १८ ऑगस्टला पावसाचा जोर राहणार

Updated: Aug 17, 2021, 06:59 AM IST
Monsoon Update : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, हवामान खात्याचा अंदाज  title=

मुंबई : राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाकरता पोषक स्थिती निर्माण झाल्याने राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात १७ आणि १८ ऑगस्टला काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या उत्तर महाराष्ट्राला या कालावधीत पावसाचा दिलासा देण्यात आला आहे. 

काही भागांत दोन आठवडय़ांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरिपांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काही भागांत पाणीसाठ्यांबाबतही चिंता आहे. मात्र, पाऊस पुन्हा काही कालावधीसाठी जोर धरणार असल्याचा दिलासादायक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी कोकण विभागात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पावसाळी वातावरणामुळे विदर्भवगळता इतर सर्व ठिकाणी दिवसाच्या कमाल तापमानात घट झाली आहे.  सोमवारी कमाल तापमानात २ अंशांनी घट दिसून आली. कु लाबा येथे २७.८ आणि सांताक्रूझ येथे २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण विभागात बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी आणि विशेषत: घाट विभागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसासह विजांचा कडकडाट होण्याचाही अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात १७ आणि १८ ऑगस्टला पावसाचा जोर राहणार आहे. या कालावधीत कोकण विभागात मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्य़ांत पाऊस होईल. काही ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्य़ांत पावसाची शक्यता असून, घाट विभागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना जिल्ह्य़ांतही काही भागांत मुसळधारा बरसतील. विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आदी जिल्ह्य़ांत जोरदर पावसाची शक्यता आहे.