दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : राज्यात गुटखाबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली अवैध गुटखाविक्री थांबवण्यासाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलणार आहे. या पार्श्वभुमीवर राज्यात २०१२ ते २०२० या कालावधीत झालेल्या कारवाईत तब्बल २२६ कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. या कालावधीत ९३ हजार ९३९ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये हा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यापुढे गुटखा विक्री करणाऱ्या सूत्रधारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत.
राज्यातील तरुणांमध्ये गुटख्याचे वाढते व्यसन लक्षात घेता २०१२ साली गुटखाबंदी लागू करण्यात आली. यानुसार राज्यात गुटखा विक्री आणि उत्पादनावर बंदी आली. मात्र तरीही बंदी असताना राज्यात अनेक ठिकाणी अवैद्यरित्या मोठ्या प्रमाणात गुटखाविक्री सुरू आहे. इतर राज्यातून हा गुटखा महाराष्ट्रात येत असून पानपट्ट्यांवर तो सहज उपलब्ध असतो. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी फसल्याचं चित्र आहे.
याप्रकरणी ६,२०६ जणांविरोधात खटले दाखल करण्यात आले. मात्र कायद्यात कठोर शिक्षेची तरतुद नसल्याने आरोपी जामीनावर मुक्त होऊन पुन्हा गुटखाविक्री करत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता महाराष्ट्र खऱ्या अर्थाने गुटखामुक्त करण्यासाठी आणि गुटखाविक्री करणाऱ्या सूत्रधारांना लगाम घालण्यासाठी त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईच्या हालचाली सुरू आहेत.
कायदा आहे, त्या कायद्याला कुणी घाबरत नाही. जामीन होतो लगेच. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने बैठक घेतली. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खात्याचे अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या कायद्यात दुरुस्ती करून धाक निर्माण झाला पाहिजे अशी चर्चा झाली.
यात मोक्का लावता येईल का ? याची माहिती आम्ही घेतोय. या व्यवसायात आता गुन्हेगार घुसले आहेत. या गुन्हेगारांना मोक्का लावला तर आळा बसेल आणि महाराष्ट्र गुटखामुक्त होईल अशी प्रतिक्रिया अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
गुटखा आणि दारूची जाहिरात कायद्यानुसार करता येत नाही. त्यातून पळवाट काढण्यासाठई त्याच ब्रँडचे इतर उत्पादन बनवून त्याची जाहिरात दाखवली जाते. त्यावर ही बंदी आणण्याचा विचार सरकार करत असल्याचे शिंगणे यांनी सांगितले.
गुटख्यात मँग्नीशिअम कोर्बोनेट हा घटक महत्वाचा असून तो आरोग्यास प्रचंड हानीकारक असतो. तरुण पिढीवर याचा होणारा विपरित परिणाम लक्षात घेऊन २०१२ साली महाराष्ट्राने गुटखाबंदी लागू केली आणि गुटखाबंदी लागू करणारं एकमेव राज्य ठरलं. मात्र तरीही ही गुटखाबंदी कागदावर आहे. कायद्यातील पळवाटा शोधून ही गुटखाविक्री उघडपणे राज्यभर सुरू आहे.
२०१२ साली गुटखाबंदी लागू करण्यासाठी त्यावेळी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी पुढाकार घेतला होता. आता पुन्हा एकदा गुटखा विक्रेत्यांना जरब बसावी म्हणून मोक्का लावण्याबाबतही अजित पवारांनी पुढाकार घेतला आहे.