पालकांनो, तुमच्या चिमुकल्यांचे डोळे 'आळशी' बनले नाहीत ना...

या मुलांना 'अम्ब्लोपिया' नावाचा डोळ्यांचा आजार झालाय

Updated: Aug 3, 2018, 01:32 PM IST
पालकांनो, तुमच्या चिमुकल्यांचे डोळे 'आळशी' बनले नाहीत ना...  title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे 'आळशी' बनलेत... या मुलांना 'अम्ब्लोपिया' नावाचा डोळ्यांचा आजार झालाय... मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळं लहान मुलांमध्ये हा दृष्टीदोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. 

आजमितीला महाराष्ट्रातील सुमारे सव्वा लाख लहान मुलांना ‘अम्ब्लोपिया’ नावाचा डोळ्यांचा आजार झालाय... मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या अतिवापरामुळं हा आजार वाढत असून, लहान मुलांची नजर त्यामुळं कमजोर होतेय... रडणाऱ्या बाळाला मोबाईल फोन, टॅब, टीव्ही किंवा व्हिडिओ गेम दाखवल्यानंतर रडणं थांबते म्हणून अनेकदा पालक बाळाच्या डोळ्यासमोर मोबाईल वगैरे धरतात. मात्र आपणच आपल्या मुलांचे डोळे खराब करतोय, याची बिच्चाऱ्या पालकांना कल्पनाच नसते.

सततच्या मोबाईल, टीव्ही किंवा टॅबच्या वापरानं

- मुलांच्या डोळ्यावर प्रकाश पडल्यामुळं डोळ्यातील बाहुली लहान होते

- डोळ्यामधून नैसर्गिकपणं येणारं पाणी बंद होऊन कृत्रिमरीत्या पाणी येऊ लागतं. डोळ्याच्या कडा लाल होऊन नजर कमी होऊ लागते

- परिणामी डोळ्याचं कायमस्वरूपी नुकसान होतं

- त्याला डोळा आळशी बनणं, असंही म्हणतात

- लहान बाळं आणि मुलांना मोबाईल-टीव्हीपासून दूर ठेवा... असा सल्ला डोळ्यांचे डॉक्टर देतात

तेव्हा पालकांनो, आपल्या लाडक्या मुलांचे बालहट्ट जरूर पुरवा... पण हट्ट पुरवताना आपण मुलांचे डोळे तर खराब करत नाही ना, याची काळजी घ्या...