कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू

विद्युत प्रवाहित तारा निष्काळजीपणे रस्ता दुभाजकात सोडल्याने एका व्यक्तीचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला.  

Updated: Apr 20, 2019, 07:27 PM IST
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा, विजेच्या धक्क्याने एका व्यक्तीचा मृत्यू title=

यवतमाळ : विद्युत प्रवाहित तारा निष्काळजीपणे रस्ता दुभाजकात सोडल्याने येथे एका व्यक्तीचा विजेच्या धक्याने मृत्यू झाला. यवतमाळच्या आर्णी मार्गावर ही थरकाप उडविणारी घटना अनेकांसमक्ष घडली. बसस्थानक ते आर्णी बायपासपर्यंत सिमेंट रस्ता आणि दुभाजकांमध्ये पथदिवे उभारण्याचे काम सुरु आहे. मात्र हे काम करताना संबंधित कंत्राटदाराने निष्काळजीपणा करत विद्युत प्रवाहीत तारा दुभाजकामध्ये सोडल्या, असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. 

दरम्यान, मोहन कृष्णराव कावरे हे रस्ता ओलांडीत असताना त्यांचा स्पर्श पथदिव्याच्या खांबाला झाला आणि त्यांना विजेचा झटका बसल्याने ते भाजले. सर्वांसमक्ष विद्युतस्पर्शाने त्यांचा मृत्यू झाल्याने संतप्त नागरिकांनी हलगर्जी करणाऱ्या विद्युत कंत्राटदार आणि वीज वितरण कंपनीविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना मदत मिळावी, अशी मागणी नागरिकांनी केली.