नाशिक : गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेल्या गाळ्यात मानवी अवयव सापडल्याची घटना रविवारी उघडकीस आली. त्या अवयवांची फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमने तपासणी केली असता त्यातून एक धक्कादायक माहितीसमोर आलीय.
नाशिकच्या मुंबई नाका हद्दीतील हरीबिहार सोसायटी आहे. या सोसायटीच्या बंद गाळयात रविवारी काही मानवी अवयव सापडले. याठिकाणी एका बादलीमध्ये केमिकल प्रक्रिया करून 14 मानवी कान आणि 2 डोकी असे अवयव ठेवल्याचे उघड झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला. या गाळ्याचे मालक यांनी 15 वर्षांपासून गाळा बंद असल्याचा दावा केला. पण, पंधरा वर्षांपूर्वी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी येथे राहत होते, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले होते.
गाळा मालकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरु केला. दरम्यान, हे मानवी अवयव फॉरेन्सिक डॉक्टरांच्या टीमकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यानच्या पोलीस तपासात दोन शीर आणि 14 कानांचे तुकडे हे मानवी अवयव अभ्यासासाठी असल्याचे स्पष्ट झाले. जे मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी या गाळ्यात रहात होते त्यांनीच अभ्यासासाठी हे अवयव जवळ बाळगल्याचं निष्पन्न झालंय.
मात्र, अभ्यासासाठी असले तरी कायद्यानुसार ते वैयक्तिक ठिकाणी बाळगणे गैर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच याबाबत पोलिसांनी अधिक तपासासाठी जिल्हा शल्य चिकित्साकांना पत्र देऊन तपासाबाबत सूचना केल्या आहेत...