कावळ्याची हुशारी, कावळ्याला समजतो शून्याचा अर्थ

कावळा तसा मुळातच हुशार पक्षी...पण तो नुसताच हुशार नाही तर गणिततज्ज्ञ देखील आहे. 

Updated: Jun 18, 2021, 09:26 PM IST
कावळ्याची हुशारी, कावळ्याला समजतो शून्याचा अर्थ  title=

अमर काणे, झी 24 तास, नागपूर - तहानलेल्या कावळ्याची गोष्ट तुम्ही आम्ही सर्वांनीच ऐकलीय...कावळा तसा मुळातच हुशार पक्षी...पण तो नुसताच हुशार नाही तर गणिततज्ज्ञ देखील आहे. 

कावळ्याची हुशारी म्हटली की आपल्यासमोर येते लहानपणी ऐकलेली तहानलेल्या कावळ्याची गोष्ट. पण कावळ्याची हुशारी त्या गोष्टीपुरता मर्यादित राहिलेली नाही. तर कावळ्याचं गणितही पक्कं असतं. कावळ्याला शून्याचा अर्थ समजतो. जर्मनीतल्या युनिवर्सिटी ऑफ तुबिनजेन इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोबायोलॉजीनं कावळ्यावर संशोधन करून एक अहवाल सादर केलाय.

या अहवालानुसार दोन कावळ्यांना कॉम्प्युटरसमोर बसवण्यात आलं. त्यानंतर ग्रे स्क्रिनवर शून्य आणि चार काळे ठिपके एकाच वेळी दाखवण्यात आले. त्यानंतर कावळ्यांना इतर संख्यांसोबत चार ठिपके दाखवण्यात आले. स्क्रीनवर एकसमान आकडे दिसताच कावळे चोच मारत किंवा मान हलवत. बऱ्याच वेळा कावळ्यांनी आपल्या कृतीतून  चार ठिपके आणि शून्य यातला फरक स्पष्ट करून दाखवला. 

गणितात शून्याला खूप महत्व आहे. विशेष म्हणजे शून्य ही भारतीयांनी जगाला दिलेली गणितशास्त्रातील सर्वात मोठी देणगी आहे. त्याचे जनक होते आर्यभट्ट. आता याच शून्याचा अर्थ कावळ्यांनाही समजू लागलाय. यावर भविष्यात आणखी संशोधन होणं गरजेचं आहे. त्यात यश आलं तर कावळ्यांची पारखी नजर गणितशास्त्रासाठी वरदान ठरेल.