विनय तिवारी, झी मीडिया, ठाणे : इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि त्यामुळे पाण्यासारखा खर्च होणारा पैसा, पेट्रोलच्या किमती वाढल्यानं होणारा मनस्ताप... या सगळ्यावर एक उत्तम उपाय आहे, तो उपाय स्वीकारलात तर इंधनही लागत नाही आणि पैसेही लागत नाहीत.
सखी सय्या तू खूबही कमात है, महंगाई डायन खाए जात है, असं म्हणण्याची वेळ मुरबाडमधल्या पांडुरंगाच्या बायकोवर आली होती. कारण, दूध विकून येणारा सगळा पैसा पांडुरंगाच्या पेट्रोलमध्येच जात होता.
मुरबाडमधल्या धसई गावातला पांडुरंग विशे रोज घरोघरी दूध पोहोचवायला जातो. पहाटे पहाटे गाई-म्हशीचं दूध काढायचं, मग घोड्यावर मांड ठोकली की दहा बारा किलोमीटर जायचं आणि घरोघरी दूध पोहोचवून यायचं, असा पांडुरंगचा नित्यक्रम झालाय.
विशे कुटुंबीयांचा घरोघरी दूध पोहोचवणं हा परंपरागत व्यवसाय.... आधी पांडुरंग आणि त्याचे वडील बाईकवरुन घरोघऱी जात दूध पोहोचवायचे. पण आता इंधनाच्या किमती एवढ्या वाढल्यायत, की बाईकवरुन दूध पोहोचवणं परवडेनासं झालं. अखेर पांडुरंगने त्याची बाईक २२ हजारांना विकली आणि पंचवीस हजारांना एक उमदा घोडा विकत घेतला. आता तो रोज घोड्यावरुन दूध पोहोचवतो.
दर आठवड्याला पांडुरंगचे चार पाचशे रुपये खर्च व्हायचा. आता घोडा आल्यावर पांडुरंगला दर आठवड्याला फक्त पन्नास रुपयांचा खुराक घोड्यासाठी आणावा लागतो.
वाढत्या इंधनाच्या किमतींवर घोडा हा उत्तम उपाय आहे. मुरबाडमधल्या पांडुरंगनं त्याच्या व्यवसायासाठी हा उत्तम उपाय शोधलाय. आता रोज ऑफिसला जाणाऱ्यांनीही सगळ्यांनी असेच घोडे घ्यावेत. सरकारनं ऑफिसला लेटमार्क पडला, तर त्याची तेवढी काळजी घ्यावी आणि घोड्यांच्या पार्किंगची व्यवस्था करावी.