आताची मोठी बातमी! कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश..

ठाणे जिल्ह्यातल्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 18 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. विरोधी पक्षानी आरोग्यव्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज पुन्हा कळवा रुग्णालयात 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 

विशाल वैद्य | Updated: Aug 14, 2023, 04:24 PM IST
आताची मोठी बातमी! कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश..  title=

विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात (Chatrapati Shivaji Maharaj Hospital) 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी चार जणांचा मृत्यू (Four Patients Died) झाला आहे.  रात्री 12 वाजलेपासून या रुग्णालयात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. मृतांमध्ये एक महिन्याच्या बाळाचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शनिवारी रात्री ते रविवारी सकाळ पर्यंत 18 रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. आता सोमवारी पुन्हा 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

संजय राऊत यांची टीका
कळव्याच्या रूग्णालयात एका रात्रीत झालेल्या 18 मृत्यूंवरून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (CM Eknath Shinde) टीका केलीय. मिंधे सरकार आल्यापासून राज्यात मृत्यूचं तांडव सुरू आहे असं राऊत म्हणाले. राज्यात वेळीच मनपा निवडणुका झाल्या असत्या, लोकप्रतिनिधींचं राज्य असतं तर असे मृत्यू झाले नसते असं राऊत म्हणाले.  

मनसे आक्रमक
कळवा रुग्णालय मृत्यू प्रकरणी मनसे आक्रमक झालीय. मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिका भवनात शिरून आयुक्तांच्या दालना बाहेर ठिय्या मांडला. कळवा रुग्णालयात झालेल्या 18 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा जाब यावेळी विचारण्यात आला.मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्त आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली....प्रशासनाला धारेवर धरत आयुक्तांनी या घटनेची जबाबदारी घेतलीच पाहिजे अशी मनसे कार्यकर्त्यांनी  मागणी केलीय..

एका दिवसात 22 मृत्यू
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रविवारी 18 रुग्णांचा मृत्यू झाला. ठाण्यातील जिल्हा शासकीय रुग्णालय गेल्या दोन महिन्यांपासून नुतनीकरणाच्या नावाखाली बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रुग्णांचा सगळा भार हा छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयावर पडत आहे. अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्री 18 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.  मृत्यू झालेल्या 18 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. तीनच दिवसांपूर्वी याच रुग्णालयात एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला होता. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच महिन्यात ठाण्यात सुपर स्पेशलिटी कॅन्सर रुग्णालयाचं भूमिपूजन केलं. तसंच जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र हे करत असताना सर्वात जुनं छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय दुर्लक्षित झाले आहे का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.