तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आलाय.  

Updated: Dec 1, 2018, 10:55 PM IST
तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल title=

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करण्यात आलाय. हा बदल मुंबईतील रविवार २ डिसेंबरच्या मेगाब्लॉकमुळे करण्यात आलाय.

मुंबई - करमाळी तेजस एक्स्प्रेस आणि दादर - मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्यांच्या वेळांमध्ये रविवार, २ डिसेंबर ते २ जानेवारी २०१९पर्यंत बदल करण्यात आला आहे. तेजस एक्स्प्रेस (२२११९) ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पहाटे ५ ऐवजी पहाटे ५.५० वाजता सुटेल. ही गाडी नवीन वेळेनुसार दादर येथे सकाळी ६ वाजता, ठाण्यात सकाळी ६.२५ वाजता, पनवेल येथे स. ७ वाजता आणि करमाळीस पूर्वीच्या दुपारी १.२० ऐवजी २ वाजता पोहोचेल. 

परतीच्या मार्गावर ही गाडी करमाळीहून पूर्वीच्या दुपारी २.३० ऐवजी दुपारी २.४० वाजता सुटेल. ही गाडी पनवेलला रात्री ९.४५ वाजता, ठाण्यात १०.३० वाजता, दादरला रा. १०.५० वाजता, सीएसएमटी येथे रात्री ११.१५ वाजता पोहोचेल. 

जनशताब्दी एक्स्प्रेस (१२०५१) ही सध्याच्याच वेळेनुसार पहाटे ५.२५ वाजता सुटून मडगाव येथे दुपारी २.०५ वाजता पोहोचेल. परतीच्या मार्गावर ही एक्स्प्रेस मडगावहून दुपारी २.३० ऐवजी दुपारी २.४० वा. सुटून पनवेलला रात्री. १०.०५ वाजता, ठाण्यात रात्री १०.५० वाजता तर दादरमध्ये रात्री ११.१५ वाजता पोहोचेल.