प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपात टळला, ATSची मोठी कारवाई

आरोपींना पाच फेब्रुवारीपर्यंत एटीएस कोठडी, बालआरोपीची सुधारगृहात रवानगी   

Updated: Jan 23, 2019, 06:19 PM IST
प्रजासत्ताक दिनापूर्वी घातपात टळला, ATSची मोठी कारवाई title=

मुंबई : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून नुकतीच एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईअंतर्गत दहशतवादी संघटनांशी संबंध असण्याच्या संशयावरुन काहींना अटक करण्यात आली आहे. इसीस या दहशतवादी संघटनेशी संपर्कात असल्याच्या संशयावरुन काही तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं.  

अटक करण्यात आलेल्या एकूण नऊ युवकांपैकी चौघे औरंगाबाद येथील असून, पाच जणांना ठाण्याच्या मुंब्रा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. यामध्ये एक युवक हा अल्पवयीन आहे, ज्याचं वय १७ वर्षे आहे. 

एएनाय या वृत्तसंस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेल्या युवकांनी उंमत-ए-मोहम्मदिया नावाची संघटना सुरू केली होती. या नऊजणांपैकी एकजण हा दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या रशिद मलबारीचा मुलगा असल्याचं उघड झालं आहे. खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधून विषारी पदार्थ देऊन एखाद्या कार्यक्रमात मोठा घातपात घडवून आणण्याचा कट त्यांनी रचल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. 

दरम्यान, औरंगाबाद कोर्टात हजर केलेल्या संशयित दाहशतवाद्यांना ५ फेब्रुवारी पर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली आहे तर त्याती बाल आरोपीची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.  जम्मन नाबी हा आरोपी आरोपी महानगर पालिका ठाणे येथे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या युवकांचा इसीसमधील कोणा एका व्यक्तीशी संपर्क होता, जो व्यक्ती भारताबाहेरचा असल्याचं स्पष्ट होत आहे. पण, त्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्याशिवाय आरोपी युवकांपैकी दोघेजण हे इंजिनियर असून, त्यातील ामखी एक जण हा इंजिनियरिंगचं शिक्षम घेत आहे. तर, एक युवक हा अकरावीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. 

दहशतवाद विरोधी पथकानुसार हे सर्वजण एका दहशतवादी कारवाईला पूर्णत्वास नेण्याच्या तयारीत होते. त्यांच्याकडून रसायनांची पावडर, ऍसिड पावडर, धारदार शस्त्रसाठा, हार्ड ड्राईव्ह, मोबाईल फोन आणि सिम कार्ड जप्त करण्यात आले आहेत. ते नेमके कोणत्या ठिकाणी दहशतवादी कारवाया करण्याचा बेत आखत होते, ही बाब मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. 

२६ जानेवारी, म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्याचदरम्यान, होणाऱ्या तपासणीदरम्यान, ही कारवाई करण्यात आल्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाच्या वाट्याला आलेलं हे एक मोठं यश ठरत आहे.