अहमदनगर : शिस्तीचे धडे देणारे गुरुजी थेट हाणामारीवर उतरलेले पाहायला मिळाले. अहमदनगरमधल्या शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रकार घडला. सभा सुरू झाल्यानंतर काही वेळातच धक्काबुक्कीला सुरुवात झाली.
विरोधकांनी मंचाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपामुळे एकच गोंधळ उडाला. यामध्येच बाचाबाचीचं रुपांतर धक्काबुक्कीत झालं. त्यातच काही शिक्षकांनी एकमेकांना मारहाण करायला सुरूवात केल्यानं, सभास्थळाचा आखाडा झाला होता.
विशेष म्हणजे शिक्षक महिला सदस्यांनी यावेळी मंचाचा ताबा घेत जोरदार घोषणा दिल्यानं, गोंधळात आणखीनच भर पडली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सभेच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्यावर सभा पुन्हा सुरू झाली. मात्र या हाणामारीच्या घटनेमुळे मास्तरांची शिकवण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली.