कल्याण : रेल्वेत विरुद्ध दिशेनं चढणं किती धोकादायक ठरू शकतं याचं उदाहरण कल्याण रेल्वे स्थानकात समोर आलं आहे.
एका टीसीच्या प्रसंगावधानामुळे आई आणि तिच्या मुलांची ताटातूट होण्यापासून टळली आहे. मंगळवारी सायंकाळी घडलेला प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. कल्याण स्टेशनवर एक कुटुंब मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्यासाठी आले होते. त्यात त्यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुलंही होती.
प्लॅटफॉर्म नंबर ६ वर हा परिवार लोकलची वाट बघत उभा असताना अचानक प्लॅटफॉर्म ५ वर मुंबईकडे जाणारी लोकल आली. त्यामुळं ब्रिजवरून जाण्याऐवजी परिवार रेल्वे रुळात उतरला आणि विरुद्ध दिशेनं लोकल पकडू लागला. यात त्यांनी त्यांच्या दोन मोठ्या मुलांना एका दारात चढवलं, तर एक वर्षाच्या लहान मुलाला मागच्या दारात ठेवून आई गाडीत चढू लागली.
मात्र याचवेळी लोकल सुटली आणि बघणा-यांच्या काळजाचा थरकाप उडाला. सुदैवानं या महिलेला तिच्या पतीनं लोकलपासून दूर केलं, मात्र मुलं गाडीत राहिल्याने तिने आरडाओरडा सुरू केला. ते ऐकून प्लॅटफॉर्म ५ वर टीसी ऑफिसमध्ये बसलेले टीसी उमेश ठाकूर यांनी धावतच लोकल पकडली आणि एक वर्षाच्या मुलाला खाली उतरवलं. त्यानंतर लोकल थांबवून इतर दोन मुलांनाही उतरवण्यात आलं.
या प्रकारानंतर काही मिनिटांच्या घाईमुळे आपण आपला जीव कसा धोक्यात घालत असतो याच हे ढळढळीत उदाहरण. त्यामुळे झी 24 तास आवाहन करतंय की आशा प्रकारे आपला आणि आपल्या मुलांचा जीव धोक्यात घालू नका. धावती लोकल पकडू नका, लोकलच्या विरुद्ध दिशेने चढू नका आणि रेल्वे रुळ ओलांडू नका.
पाहा व्हिडिओ