आशीष अम्बाडे, झी 24 तास, चंद्रपूर : ताडोबात यंदा देखील पर्यटन हंगामाचा शेवट गोड झाला आहे. प्रकल्पातील छोटी मधू वाघिणीचे आपल्या बछड्यांसह दर्शन झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बछड्याच्या इटुकल्या पावलांनी जंगल आनंदित झाले आहे. तसेच दुर्मिळ मानले जाणाऱ्या छोटी मधुचे बछड्यांसह दर्शन झाले आहे. वन्यजीव पर्यटक केयुज कडूकर यांनी याची दृश्ये टिपली असून ती सोशल मीडियात चर्चेचा विषय बनली आहेत.
माया आणि बछडे, मटकासूर, छोटी तारा, लारा या वाघ वाघिणीनी ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पातील यंदाचा पर्यटन हंगाम गाजविला. मात्र वाघीण छोटी मधू ने हंगामाचा गोड शेवट केला आहे. नुकतेच छोटी मधू वाघिणीने आपल्या बछड्यांसह पर्यटकांना दर्शन दिले. गेले काही दिवस छोटी मधू आपल्या बछड्यांसह जणू अज्ञातवासात होती. आपल्या 3 बछड्यांचे संगोपन आणि त्यांना भवतालची जाणीव करून देण्यासाठी छोटी मधू आईच्या भूमिकेत होती.
छोटी मधूचा तोरा ठाऊक असलेले पर्यटक तिच्या दर्शनासाठी आतुर होते. अखेर तिने पर्यटकांना दर्शन दिलेच. बछड्याच्या इटूकल्या पावलांनी जंगल आनंदित झालेले पाहायला मिळाले. छोटी मधुचे आपल्या बछड्यांसह दर्शन सध्या दुर्मिळ बाब झाली आहे. छोटी मधूच्या 3 बछड्याना कॅमेराबद्ध करण्यात चंद्रपूरचे वन्यजीव पर्यटक केयुज कडूकर यांना अखेर यश आले असून त्यांनी टिपलेली ही दृश्ये आता वायरल होत आहेत.