अहो आश्चर्यम, ग्रामसेवक करतोय सोनसाखळी चोरी,

चांदवडचा ग्रामसेवक रविवारी करत होता शहरात चेन स्नॅचिंग, पाच लाखाच्या मुद्देमालासह  नाशिक शहर पोलिसांच्या अटकेत..

Updated: Dec 18, 2021, 02:49 PM IST
अहो आश्चर्यम, ग्रामसेवक करतोय सोनसाखळी चोरी, title=

सोनू भिडे, नाशिक: बेरोजगार आणि गरीब युवक गुन्हेगारीकडे वळतात अस आपण ऐकलं होतं मात्र चक्क शासन व्यवस्थेत काम करणारा ग्रामसेवक सोनसाखळी चोरू लागला तर... नाशिक जिल्ह्यातील एका ग्रामसेवकाला अशाच सोनसाखळी चोरी प्रकरणी पुराव्यासह अटक करण्यात आली आहे.

 

 नाशिक  जिल्ह्यातील  चांदवड येथील प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकाने झटपट पैसे कमविण्यासाठी चक्क सोनसाखळी चोरीचा धंदा सुरु केला होता. संशयित  आरोपी विपुल पाटील हा चांदवड येथे राहणारा... वडिलांच्या अनुकंप तत्वावर ग्रामसेवक म्हणून रुजू झाला आहे. रविवारी मिळणाऱ्या सुट्टीचा फायदा घेत त्याचा हा साईड बिझिनेस सुरू होता.

 

सध्या नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात सोनसाखळी चोरी झाली होती. सदर घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. सीसीटीव्हीत दिसत असलेला आरोपीचा व्हिडीओ कोरोना काळात पोलीस मित्र म्हणून काम केलेल्यांच्या WhatsApp ग्रुप वर शेयर करण्यात आलं होता. याच ग्रुप मधील एकाने संशयितला बघितले आणि पोलीस स्टेशनला कळविले असता तत्काळ पथकाने सापळा रचून विपुलला ताब्यात घेतले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार विपुल याने आता पर्यंत पाच सोनसाखळ्या चोरल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून ११ तोळे सोने आणि एक मोटार सायकल जप्त केली आहे. याची साधारण किमत ५ लाख रुपये आहे. या चोरीत त्याने तीन गाड्या वापरल्या आहेत.  याप्रकरणी गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

वैशिष्टपूर्ण म्हणजे  नाशिक शहरात सोनसाखळी चोरणाऱ्या अभियांत्रिकीचा विद्यार्थ्यांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्याच्यासोबत चार साथीदारांना पकडण्यात आले या सर्वांकडे जवळपास एक कोटी च्या दरम्यान मुद्देमाल मिळून आला होता. या सर्वांना गंगापूर पोलिसांनी अटक केली होती.

 

 गंगापूर रोड नाशिक शहरात सर्वात प्रतिष्ठित आणि श्रीमंत परिसर समजला जातो. या परिसरात हॉटेल्स मॉल्स अशी रेलचेल आहे आणि लग्न समारंभ करणे प्रतिष्ठित समजले जाते. परिणामी सोनसाखळी सोडणाऱ्या तरुणांचं प्रमुख लक्ष गंगापूर रोड परिसर असतो.

 

नाशिक पोलीस आयुक्तांनी गेल्या काळात साडेतीन कोटी रुपयांच्या सोनसाखळ्या परत केल्या होत्या यावरून आपल्याला नाशिक शहरात सोनसाखळी चोरांचा हैदोस याची कल्पना येते.

 

पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये सोनसाखळी चोरांच्या अभिनव पद्धती समोर आल्या आहेत. ज्यामध्ये सोनसाखळी चोरल्यानंतर चोर स्वतः घटनास्थळी येऊन काय घडले याचा तपास करु लागतो तसेच सोनसाखळी चोरून सोने कर्ज देणाऱ्या संस्थांकडे तो सोनसाखळ्या तारण ठेवतो नंतर तिथून काढून पावती दाखवत सराफ व्यावसायिकांकडे बिनदिक्कतपणे विकतो.

 

महिलांनी आपल्या दागिन्यांचे प्रदर्शन  करत शहरात वावरणे धोक्याचे झाले आहे त्यामुळे लग्न समारंभ कुठल्याही उत्सवात जाताना महिलांनी सार्वजनिक ठिकाणी सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केल आहे.