अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपुरात मुख्यमंत्र्यांविरुद्ध सरप्राईज उमेदवार देण्याची घोषणा काँग्रेसनं केली खरी, मात्र आता तीच पक्षाच्या अंगाशी येण्याची चिन्हं आहेत. बाहेरच्या उमेदवाराला स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे.नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस यांच्याविरुद्ध काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे. तिथे बाहेरून सरप्राईज उमेदवार देणार असल्याचं काँग्रेस नेते सांगत आहेत. मात्र ही घोषणा होताच मतदारसंघातील पक्षाचे आजी-माजी नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याबाबत स्वाक्षऱ्यांचं निवेदन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना पाठविण्यात आलं आहे.
पक्षासाठी स्थानिक कार्यकर्ता झटतो. मात्र काही नेते दिल्लीत जाऊन चमकोगिरी करतात. पक्षश्रेष्ठी या चमकोगिरी करणा-यांनाच नेता समजतात, अशी खंत काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरेंनी बोलून दाखवली आहे.
आधीच नागपुरात काँग्रेसची स्थिती चांगली नाही. गटबाजीमुळे पक्षाची वाताहत झाली आहे. त्यात आता बाहेरून उमेदवार लादण्यात येणार असल्याचं समजल्यावर ही गटबाजी अधिकच उफाळून आली आहे.