आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : चंद्रपूरच्या (Chandrapur) जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वांना हादरवून सोडलं आहे. शाळेतील विद्यार्थी सहलीला (Picnic) गेले होते आणि तिथेच त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे (food poisoning) तब्बल 51 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. तर 12 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सहल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. जेवणानंतर मुलांची प्रकृती बिघडली आणि एकच खळबळ उडाली.
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात बोरगाव जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची सहल गेली होती. यावेळी सहल संपल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवणामध्ये चिकन देण्यात आले होते. मात्र जेवताच विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. स्थानिक इको पार्कमध्ये हे मांसाहारी जेवण शिजवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सहलीनंतर हे चिकन खाताच विद्यार्थ्यांना त्रास सुरु झाला. या जेवणातून 52 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. तर 12 विद्यार्थ्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस आणि शिक्षण विभागाची पथके शाळेत दाखल झाली असून घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सहलीवर घेऊन जात असताना याची माहिती पालकांना देणं गरजेचं होत. मात्र शिक्षकांनी माहिती दिली नसल्याचा आरोप पालकांनी केला. याबाबत पालकानी संताप व्यक्त केला आहे.
वांगी समजून धोतऱ्याची भाजी खाल्ल्याने 7 जणांना विषबाधा
दरम्यान, याआधी चंद्रपुरात वांगी समजून विषारी धोतऱ्याच्या फळांची भाजी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सात जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. रात्रीच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथे ही घटना घडली होती. जेवणानंतर अचानक प्रकृती बिघडल्याने सर्वांना गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांनतर सर्वांना चंद्रपूरला हलवण्यात आहे.