पुणे : कोरोनामुळे यंदा राज्यातील शाळा प्रत्यक्ष स्वरूपात ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. पण, आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववी, अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यात शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास परवानगी दिली जाते. मात्र, या शैक्षणिक वर्षांत मार्चपासून एप्रिल अखेरपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात.
एप्रिल अखेरपर्यंत शाळा शनिवारी पूर्णवेळ आणि रविवारी ऐच्छिक स्वरूपात सुरू ठेवता येईल. पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात घेऊन निकाल मेमध्ये जाहीर करावा असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.