हिंगोली : हिंगोली येथील राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या जवानाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विष्णू मंदाडे असे या मयत जवानाचे नाव असून ते कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी येथील रहिवासी होते. 2014 मध्ये त्यांना नोकरी लागली होती. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा त्यांच्या कुटुंबीयांनी आरोप आहे. विष्णू मंदाडे प्रामाणिक जवान होते. 'विष्णू म्हणेल ती कामगिरी बजावत होते. त्यामुळे वरिष्ठ त्यांची वारंवार दूरदूर पर्यंत ड्युटी लाउन पिळवणूक करीत असत. कुणी ही गैरहजर राहिल्यास त्याचा भार विष्णू मंदाडेवर येऊन पडायचा. दूर दूर त्यांच्या ड्युट्या लावल्या जायच्या. जवळ ड्युटी हवी असेल तर वरिष्ठांना पैसे पुरवावे लागत', अशा गंभीर बाबी विष्णू यांनी आपल्या कुटुंबियांना अनेकदा सांगितल्या होत्या. ते काल रजेवर आले होते. रजेवर येण्यापूर्वी त्यांचे आणि त्यांच्या वरिष्ठांचे यावरूनच खटके उडाले होते. याच रागातून विष्णू मंदाडे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबायांनी केला आहे.
शिवाय विष्णूच्या मोठ्या भावाने आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात वरिष्ठांच्या विरोधात लेखी तक्रार सुद्धा दिली आहे. या संपूर्ण प्रकराबाबत आम्ही हिंगोली येथील राज्य राखीव दलाच्या पोलीस अधिक्षकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी कॅमेऱ्यासमोर या विषयावर बोलण्यास नकार दिला. राज्य राखीव दलातील अनेक जवान अजूनही वरिष्ठांचा जाच सहन करीत असल्याचे विष्णू यांच्या भावाने म्हटले आहे. पण वरिष्ठ या प्रकरणावर पुढे येऊन काही बोलत नसल्याने या प्रकरणाचा गुंता अधिकच वाढला आहे.