गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांनी कर्मचाऱ्याला श्रीमुखात भडकावली

राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडिल आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी घुंगशी इथल्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन कुठलाही अधिकार नसताना तपासणीचा प्रयत्न केला. 

Updated: Jul 2, 2017, 07:59 PM IST
गृहराज्यमंत्र्यांच्या वडिलांनी कर्मचाऱ्याला श्रीमुखात भडकावली title=

अकोला :  राज्याचे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडिल आणि माजी आमदार विठ्ठल पाटील यांनी घुंगशी इथल्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात जाऊन कुठलाही अधिकार नसताना तपासणीचा प्रयत्न केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी तिथल्या कर्मचाऱ्याला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. 

रणजीत पाटलांचं मूळ गाव असलेल्या घुंगशी इथल्या पाटील आणि देशमुख विद्यालयातल्या वादाचं प्रकरण काही वर्षांपासून गाजत आहे. या गावात विठ्ठल पाटील आणि विज्युक्टा संघटनेचे पदाधिकारी असलेले प्रा. संजय देशमुख या दोघांचीही स्वतंत्र विद्यालयं आहेत. मात्र, शाळेतली पटसंख्या कमी होण्यावरुन दोन्ही संस्थांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. 

विठ्ठल पाटील यांनी शनिवारी संजय देशमुख यांच्या भाऊसाहेब देशमुख विद्यालयात अचानक जाऊन तपासणी केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारीही उपस्थित होते. हा सारा प्रकार देशमुख विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय आठवले यांनी मोबाईलमध्ये कैद केला. त्याला आक्षेप घेत विठ्ठल पाटील यांनी मुख्याध्यापक आणि कर्मचा-यांशी वाद घातला. 

त्याही पुढे जात विठ्ठल पाटील यांनी कर्मचा-याच्या कानशिलात लगावली आणि मुख्याध्यापक तसंच कर्मचा-याला शिवीगाळही केली. या प्रकरणी संजय आठवले यांनी मुर्तिजापूर पोलीस ठाण्यात माजी आमदार विठ्ठल पाटिल यांच्याविरुद्द तक्रार दाखल केली आहे.