पुणे : Ajit Pawar on Silver Oak Attack : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले. मीडिया माहिती गोळा करू शकते, पण पोलीस का माहिती गोळा करू शकत, असा सवाल त्यांनी केला. गुप्तवार्ता जमवण्यात पोलीस कमी पडले, असे अजित पवार म्हणाले. त्याचवेळी यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध पोलीस घेतील, असे अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न (ST workers) निकाली काढण्याचा प्रयत्न झाला. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, त्या सोडविण्यात आल्यात. त्यांना चांगला पगारही दिला. मात्र, कोणाच्या सांगण्यावरुन ते अडून बसले होते. जे जे करता येईल ते केले. घरातील प्रश्न होता, तो एकत्र बसून सोडविण्याचे आवाहन केले. शरद पवारसाहेबांनीही मध्यस्ती केली. तरीही आंदोलन करण्यात येत होते. कोरोना काळात एसटी बंद होती. याचा विचार करुन कोट्यवधी रुपयांची निधी दिला. एप्रिलचा पगारही दिला. मात्र, मागण्या मान्य केल्या तरी आंदोलन का, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
गेली 60 वर्ष पवारसाहेब राजकारण आणि समाजकारण करत आहेत. असा प्रकार झालेला नाही. या हल्ल्यामागे कोण आहे, हे पोलीस चौकशीत समजेल. त्यानंतर मी बोलेन. पोलीस विभाग त्यांचं काम करतील. अनेक वर्षं पवारसाहेब काम करत आहेत. पण एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली. त्यामागे कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली, असे अजितदादा म्हणाले.
मला आश्चर्य वाटत की दो दिवसांपूर्वी आंदोलन यशस्वी झालं म्हणून गुलाल उधळण्यात आला. मग सिल्व्हर ओकवर जाण्याचा काय उद्देश होता. सिल्व्हर ओकवरील हल्ला हे पोलीस यंत्रणेचे अपयश आहे. तुम्हाला हे आधी का कळलं नाही. तिथं जाणारे लोक मीडीयाला घेऊन पोहोचले. अर्थात मीडियाचे हे कामच आहे की जे आहे ते दाखवणं. मग मीडियाला जे कळलं ते पोलीस यंत्रणेला का कळलं नाही, असा थेट सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
आम्ही अनेकदा बैठक घेतल्या. पण नंतर ती लोकं संघटनांच देखील एकेनाशी झालीत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. तुम्हालाही ती भाषा आवडणार नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील, असे अजित पवार म्हणाले.