विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वर्डी गावामध्ये श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या पुण्यतिथीचा फार मोठा सोहळा पार पडतो. त्यात सव्वाशे क्विंटल गव्हाचा भंडारा लोकवर्गणीतून दिला जात असल्यानं शेकडो हात त्यात रात्रंदिवस राबतात. राज्यातील हजारो गावांना एकोप्याचा संदेश देत वर्डी गावाने या सोहळ्यातून एक वेगळी परंपरा जपलीय.
चोपडा या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १३ किलोमीटर अंतरावर सातपुडाच्या पायथ्याशी वसलेलं वर्डी हे गाव... या गावाचे आराध्य दैवत श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या ८२ व्या पुण्यतिथीचा 'नवचैतन्य महोत्सव' सध्या गावात पार पडतोय. सुकनाथ बाबा आणि वर्डी या गावाचे एक वेगळं नाते होतं. प्रपचांतून परमार्थ या शिकवणीने अनेक भक्तगण जमा होऊ लागले. वर्डी गावात २० मार्च १९३५ रोजी बाबांनी संजीवन समाधी घेतली. तेव्हापासून आजतागायत बाबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव वर्डी गावात साजरी केला जातो.
सुकनाथ बाबांच्या या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रोडगे म्हणेजच बाटी, वरण, वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद दिला जातो. त्यासाठी काही दिवसांपासूनच वर्डी गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करतात. गव्हाच्या पिठाचे पूजन करून अख्ख्या गावातील अबालवृद्ध पिठाचे गोळे करून बाटी तयार करतात. गोवऱ्यांच्या भट्टीवर बाटी भाजून तिला चवदार बनविण्याचा प्रयत्न केला जातो.
दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात आरती, मारोती अभिषेक, समाधी अभिषेक, समाधी स्नान, महाप्रसाद भोजन तसंच पालखी मिरवणूक काढून भजन, कीर्तन भारुडाचा कार्यक्रमाने या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होते. संपूर्ण गाव आपसातील मतभेद विसरुन एकत्र येतात, हे या पुण्यतिथी सोहळ्याचं आगळं-वेगळं वैशिट्य म्हणावं लागेल.