...म्हणून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली; महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर

नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रिक्षा चालकाच्या भितीने तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 6, 2024, 04:17 PM IST
...म्हणून तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली; महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर title=

Nanded Crime News : महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. नांदेडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. रिक्षाचालक थांबत नसल्याने एका तरुणीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. या घटनेत तरुणी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी रिक्षाचालकावर अपहरणाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. 

महाविद्यालयीन तरुणी रिक्षातून प्रवास करत असताना सांगितलेल्या ठिकाणी रिक्षा थांबत नसल्याने तिने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. धक्कादायक घटना नांदेड शहरात घडली आहे. नागरिकांनी रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. रिक्षाचालकावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकणारी एक तरुणी आपल्या गावी निघाली होती. गुरुवारी रात्री रेल्वेस्टेशन परिसरात ती थांबली होती. यावेळस एक रिक्षाचालक तिच्याजवळ आला आणि हिंगोली गेट परिसरातून बस मिळेल तिथपर्यंत सोडतो म्हणून तरुणीला त्याने रिक्षामध्ये बसवले. हिंगोली गेट जवळ पोहचले  असता तरुणीने रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र, रिक्षाचालकाने तिचे ऐकले नाही. रिक्षा न थांबवता रिक्षाचालक भरधाव वेगात दुसरीकडेच रिक्षा नेत होता. तरुणीने आरडाओरड केला. मात्र, तरी देखील रिक्षाचालक रिक्षा थांबवत नसल्याने तरुणीने धावत्या रिक्षामधून उडी घेतली. 

धावत्या रिक्षातून उडी घतेल्याने तरुणी जखमी झाली. तरुणी खूपच भयभीत झाली. तरुणीची अवस्था पाहून स्थानिक तिच्या मदतीसाठी धावून आले. नागरिकांनी त्वरित रिक्षाचालकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
या प्रकरणी रिक्षाचालक शेख नसीर शेख इसाक याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 140, आणि 62 अन्वये वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिक्षा न थांबवता तो चालक तरुणीला कुठे नेणार होता? असं करण्याामागे त्याचा उद्देश काय होता याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तरुणींमध्ये दहशत निर्माण झाली आहे.