धक्कादायक! गुप्तधनाचा हव्यास नडला आणि जीव गमावून बसला

गुप्तधन मिळले, पैसे डबल होतील या आमिषाला तो भुलला आणि तिथेच तो फसला

Updated: Feb 26, 2022, 05:55 PM IST
धक्कादायक! गुप्तधनाचा हव्यास नडला आणि जीव गमावून बसला title=

गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली : गुप्तधनाच्या आमीषाला फसला आणि जीवनिशी गेला. हिंगोलीतल्या वाढोना शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला अटक केली आहे.

हिंगोलीच्या वाढोना शिवारीतल विहरित काल पोत्यात दगडासह एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांच्या तपासात हा मृतदेह पानकण्हेरगाव इथल्या 48 वर्षीय शिवाजी काटकर याचा असल्याचं उघड झालं. पोलिसांनी याप्रकरणी त्याच गावातील रामदास झुंगरे याला अटक केली आहे. 

मित्रानेच रचला खूनाचा कट
मृत शिवाजी काटक आणि आरोपी रामदास झुंगरे यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. शिवाजी काटकर हा आपल्या घराकडे पहात असतो यावरुन त्यांच्यात भांडण झालं होतं. हाच राग मनात ठेवून रामदासने शिवाजीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. शिवाजी काटकरला गुप्त धन मिळवण्याचा हव्यास होता. 

याच गोष्टीचा फायदा घेत रामदासने शिवाजीला गुप्त धन काढणारे माझ्या ओळखीतले आहेत, ते पैसाही डबल करून देतात अस सांगितलं. त्यावर विश्वास ठेवून मयत शिवाजी काटकरने नातेवाईकांकडून काही पैसे जमविले. 

15 फेब्रुवारीच्या रात्री रामदासने शिवाजी काटकरला पैसे घेऊन वाढोना शिवारात येण्यास सांगितलं. गुप्तधन आणि पैशाच्या हव्यासापोटी शिवाजी काटकर त्या ठिकाणी पोहचला. पण रामदासच्या मनात काही वेगळंच होतं. त्याने शिवाजीचा काटा काढण्याचा पूर्ण प्लान तयार केला होता. यासाठी त्याने उत्तर प्रदेशमधल्या 3 गुंडांना बोलावून घेतलं होतं.

शिवाजी काटकर या ठिकाणी पोहचात चौघांनी त्याचे हातपाय दोरीने बांधले आणि रुमालाने गळा आवळून त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी शिवाजी काटकरचा मृतदेह एका पोत्यात भरला त्यात मोठे दगड टाकून पोतं विहिरीत फेकून दिलं. यानंतर आरोपींनी शिवाजी काटकरकडे असलेले 2 लाख रुपये आणि दीड तोळं सोनं घेऊन पोबारा केला.

असा झाला उलगडा
घटनेच्या दहा दिवसांनंतर शिवाजी काटकरचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना काही गावकऱ्यांना दिसला आणि घटनेला तोंड फुटलं. सेनगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पुरावे गोळा केले. त्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपी रामदास झुंगरेच्या  मुसक्या आवळल्यात तर तीन आरोपीच्या मागावर असल्याची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी दिली.