पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे रेल्वे पोलिसांच्या (Pune Railway Police) मारहाणीत एक तरुणाचा मृत्यू झाला आहे. या तरुणाचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचं बोललं आहे. ज्या पोलिसांनी तरुणाला मारहाण केली ते पोलीस फरार झाले आहेत.
पोलीस तरुणाला ससून रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये सोडून फरार झाले आहेत. या घटनेबाबत रेल्वे पोलीस काहीही बोलण्यास नकार देत आहेत. सदर तरुणाचे नाव नागेश रामदास पवार असं आहे. यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी ही नकार दिला आहे.
पोलीस कोठडीतील संशयित तरुणाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी केली आहे.
नागेश पारधी समाजातील असून यमगरवाडीच्या प्रकल्पात त्याचे शिक्षण झालं होतं. काही दिवसांपूर्वी तो पुण्यात रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आला होता. छोटे मोठे व्यवसाय करून तो कुटुंबाचं पोट भरायचा. 15 ऑगस्टला त्यानं शहरात फुगे विकले. 16 तारखेला त्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयित म्हणून अटक केली. तो पोलीस कस्टडीत असताना त्याला आजारी असल्याच्या कारणाखाली पुण्यातला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
याबाबतची माहिती कळल्यानंतर त्याचे नातेवाईक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमा झाले आहेत. पारधी समाजासाठी काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे हे देखील ससूनमध्ये पोहोचले आहेत. नागेशचा मृत्यू अनैसर्गिक असून त्याबाबत चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान लोहमार्ग पोलिसांकडून या संदर्भात कुठल्याच प्रकारची माहिती अथवा स्पष्टीकरण मिळू शकले नाही.