Shivsena : राज्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात महत्त्वाची घडामोड आज घडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या संकटात मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलेले खासदार अरविंद सावंत यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं वागलंय ते पाहता ते सध्या वेठबिगार झाले आहेत. कुणीतरी तक्रार केली पण त्याची छाननी केली गेली नाही, असा आरोप सावंत यांनी केलाय. आम्ही कागदपत्रं दिली त्याची छाननी नाही, निवडणूक आयोग कुणाच्या आदेशानं वागतंय, बापाचं नाव बापच असतं, निवडणूक आयोग आमचा बाप नाही, ते तर वेठबिगार असा हल्लाबोल अरविंद सावंत यांनी केलाय.
भारताची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक आहे. कुणीही काहीही सांगेल आणि तुम्ही निर्णय घेता, असं म्हणत सावंत यांनी खडे बोल सुनावले आहेत. शिंदे गटाचा एक माणूस सांगतो पाच वर्ष निर्णय लागणार नाही, अख्खा महाराष्ट्र सगळे डोळं उघडे ठेवून पाहतोय, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
हिंदूह्रदयसम्राट शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली पक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्ष पुढं चालवला आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. शिवसेना हे आमच्या बापाचं नाव आहे, ते कुणीही आलं तरी काढून घेऊ शकणार नाही, असं अरविंद सावंत म्हणाले.
आणखी वाचा- धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटापुढे 'या' चिन्हांचा पर्याय, वाचा सविस्तर
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या 1968 मधील पक्ष चिन्हाच्या ऑर्डरनुसार आज निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत नव्या चिन्हाची निवड करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिली आहे.