पुणे : राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. शिवनेरी गड जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हा शिवनेरी गड आज शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिवमय झालं आहे. हजारो शिवप्रेमी, शिवभक्त गडावर शिवजयंती साजरी करण्यासाठी उपस्थित राहिले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांची आज तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी होत आहे. शिवनेरी गडावर शिवरायांचा जन्म झाला होता. त्यामुळे आज इथे शिवजन्माचा मोठा सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे हजर राहणार आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्तांनी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर रात्रीपासूनच गर्दी केलीय. सकाळी सात वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते गडावर शिवाई देवीची महापुजा झाल्यावर गडावर विविध कार्यक्रमांना सुरूवात होणार आहे.
शिवनेरी गडावर '१०१ शिवबा सलामी' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. यासाठी ५१ मुली आणि ढोल पथकातील ५० विद्यार्थी अशी १०१ मुलं रोमहर्षक संचलन आदिवासी नृत्याच्या माध्यमातून सादर करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवनेरीवर विशेष कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं आहे. एवढंच नव्हे तर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जगभरातले १२ राजदूत शिवजयंती साजरी करणार आहेत.