शिवसेना लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार- सुभाष देसाई

शिवसेनेचं ठरलं, भाजपशी दोन हात करणार

Updated: Oct 6, 2018, 07:24 PM IST
शिवसेना लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार- सुभाष देसाई title=

कोल्हापूर:  शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक स्वबळावर लढेल, असे विधान राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ते शनिवारी कोल्हापूर येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला. 

राज्याच्या सत्तेत आल्यापासूनच शिवसेना व भाजपमध्ये सातत्याने कुरबुरी सुरु आहेत. यावरून शिवसेनेच्या मंत्र्यांनी अनेकदा राजीनामा देण्याची भाषाही केली होती. मध्यंतरी दोन्ही पक्षांतील दरी वाढल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये समेट घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. 

मात्र, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जाहीर टीका करणे सुरुच ठेवले होते. ऑगस्ट महिन्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना भवनात एक बैठकही घेतली होती. या बैठकीत लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात रणनीती कशाप्रकारे आखायची, यावर चर्चा झाली होती.

मुंबईत लोकसभेचे सहा मतदारसंघ आहेत. त्यातील काही मतदारसंघ हे भाजपाकडे आहेत. हे मतदारसंघ भाजपकडून कशाप्रकारे हिसकावता येतील, यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहणार आहे. तसेच राज्यभरात शिवसेनेच्या विद्यमान १८ खासदारांना पुन्हा संधी मिळणार आहे. भाजपा नेते आणि खासदार किरीट सोमय्यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेने विशेष रणनीती आखल्याची चर्चा आहे.