साईचरणी सोडून गेलेल्या बाळासाठी 'ती' आई परतली आणि....

प्रेमप्रकरणातून दिलेला एका मुलीला जन्म... 

Updated: Jun 4, 2019, 09:55 AM IST
साईचरणी सोडून गेलेल्या बाळासाठी 'ती' आई परतली आणि....  title=

शिर्डी : परिस्थितीपुढे अनेकदा शरगणागती पत्करत कित्येकांना काळजाचा दगड करावा लागतो. अशीच काहीशी घटना काही दिवसांपूर्वी शिर्डी येथे घडल्याचं पाहायला मिळालं. आपल्या बाळाला सोडून एका महिलेने पळ काढला होता. अवघ्या पाच महिन्यांच्या चिमुरडीला मंदिरात सोडून तिने पळ काढला होता. ३१ मे रोजी ही घटना घडली होती. आपल्याच बाळाला सोडून जाणारही ही आई, आता परतली आहे. 

सीसीटीव्हीमध्ये त्या महिलेचं हे कृत्य कैद झालं होतं. तेव्हापासूनच पोलीस यंत्रणांकडून तिचा शोध घेण्यात येत होता. पण, बाळाला सोडून गेल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच ती साईमंदिरात परतली. प्रेमप्रकरणातूनच आपण या मुलीला जन्म दिला त्यामुळेच बाळाला इथे सो़डून दिल्याची कबुली तिने दिली. संबंधित महिला ही जळगाव जिल्ह्यातील कडोली गावची रहिवासी आहे. 

लग्नानंतर तिला एक मुलगाही झाला होता. पण, पती वारंवार दारू पिऊन त्रास देत असल्यामुळे पतीला सोडून तिने मामाकडे राहणं पसंत केलं. तिथे, एका व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. याच संबंधातून तिला एक मुलगी झाली. मुलीच्या जन्मानंतर तिला सांभाळण्यास पती आणि प्रियकर या दोघांनीही नकार दिला, त्यामुळेच तिने मुलीला मंदिरात सो़डण्याचा निर्णय घेतला होता. 

 

'प्रसूतीनंतरही त्या व्यक्तीने मुलीला आपलंसं केलं  नाही, त्यामुळे मुलीला दान देण्याचं माझ्या मनात आलं', असं ती महिला म्हणाली. पोलिसांना दिलेल्या जबाबात तिने हे स्पष्ट केलं.