शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, दर महिन्याला तब्बल 'इतक्या' लाखांचा खर्च

शिर्डीच्या साई मंदिराची सुरक्षा महाराष्ट्र पोलिसांच्या हाती होती आता त्यांच्या बरोबरच MSF चे 74 जवान तैनात असणार आहेत.. त्यामुळे संस्थानचे सुरक्षा रक्षक, महाराष्ट्र पोलीस आणि MSF चे जवान अशी तिहेरी सुरक्षा साई मंदिर आणि परिसराला मिळाली आहे..

Updated: Jul 1, 2023, 08:15 PM IST
शिर्डीच्या साई मंदिराच्या सुरक्षेत मोठा बदल, दर महिन्याला तब्बल 'इतक्या' लाखांचा खर्च title=

कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : साई मंदिराच्या सुरक्षेत (Sai Mandir Security) आता मोठा बदल करण्यात आला आहे. साई संस्थानकडे (Sai Sansthan) आतापर्यंत दुहेरी सुरक्षा व्यवस्था होती. साईबाबा मंदीरातील सुरक्षा व्यवस्था संस्थानचे कर्मचारी करतात. तर मंदिर परीसराच्या सुरक्षेतेसाठी महाराष्ट्र पोलीसांची (Maharashtra Police) कुमक नेमण्यात आलेली होती. त्याच बरोबर दररोज बॉम्ब शोधक पथकाडून मंदीराची तपासणी केली जाते. मात्र, साई मंदिराला धोका असल्याचे निनावी मॅसेज अनेकदा साई संस्थानला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे मंदिरात सध्याच्या सुरक्षा व्यवस्थे सोबतच  CISF ची सुरक्षा असावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी 2018 साली मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात धाव घेत त्या आशयाची याचिका दाखल केली होती. 

मात्र शिर्डी ग्रामस्थांनी CISF सुरक्षेला विरोध करत न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने साई मंदिराच्या सुरक्षेसाठी MSF ची सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. आता याची अंमलबजावणी करण्यात येणार असून उद्यापासूनच महाराष्ट्र सुरक्षा बलाची (Maharashtra Security Force) सुरक्षा असणार आहे. यात 74 जवानांचा समावेश आहे. या सुरक्षेचा खर्च साई संस्थान करणार असून त्यासाठी प्रत्येक महिन्याला 21 लाख रुपये खर्च होणार आहेत.

गुरुपोर्णिमेसाठी शिर्डी सज्ज
लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल झाले आहेत. राज्यभरातून अनेक पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. यंदाही गुरूपौर्णिमा निम्मित साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पालख्या पायी शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झालीय. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी 2 जुलै ते 4 जुलै या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होत आहे. या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी केलंय

श्री साईबाबा हयातीत असल्यापासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे. साईबाबांवर श्रध्‍दा असणारे असंख्‍य भाविक दरवर्षी गुरुपौर्णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात आणि या उत्‍सवास हजेरी लावतात. तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून सोमवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. सोमवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी सिवा शंकर यांनी दिली आहे. 

तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवानिमित्त अशी असणार साईभक्तांची व्यवस्था

- गुरुपौर्णिमेच्या मुख्य दिवशी साईमंदिर असणार रात्रभर खुलं असणार आहे. 

- नोंदणी झालेल्या 29 पालख्या होणार साईनगरीत दाखल 

- पावसाच्या वातावरणामुळे 72 हजार स्केअर फुटाच्या मंडपाची व्यवस्था 

-  रेल्वेस्टेशन , बसस्थानक , साईभक्त निवास जवळून साईमंदिरात येण्यासाठी भक्तांसाठी 22 बसेसच्या माध्यमातून मोफत बससेवा..

-  उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच नवीन लाडू विक्री केंद्र.

- साईभक्तांसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असणार...