'पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण..'; मनसेची मुख्यमंत्री शिंदेंना ऑफर

MNS Slams CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याकडे या प्रश्नासंदर्भात अशापद्धतीने मागणी करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 30, 2023, 09:47 AM IST
'पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण..'; मनसेची मुख्यमंत्री शिंदेंना ऑफर title=
सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या भावना

MNS Slams CM Eknath Shinde: कल्याण-डोंबिवलीकरांना रस्ते मार्गाने प्रवास करताना कपाळावर आठ्या आणणारा शीळफाटा पुन्हा चर्चेत आहे. वाहतुककोंडीसाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या या मार्गावरुन आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं निशाणा साधला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावरुन टीका केली आहे. शिळफाट्यावरील वाहतुककोंडीचा मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना तुमचे सुपुत्र याच भागातील खासदार असल्याची आठवण पाटील यांनी खोचक शब्दांमध्ये करुन दिली आहे.

नेमकं काय म्हटलं आहे मनसेनं?

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी रात्री आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन 3 फोटो शेअर केले आहेत. यापैकी पहिला फोटो गुगल मॅप्सवर शीळफाट्याजवळ किती वाहतुककोंडी आहे हे दर्शवणारा स्क्रीनशॉट आहे. दुसरा आणि तिसरा फोटो हा शीळफाट्यावरील वाहतूक कोंडीचा आहे. रस्त्यावर रात्रीच्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. वाहतुककोंडीमध्ये अडकलेल्या कारमधूनच हे फोटो काढण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. हे फोटो शेअर करताना राजू पाटील यांनी सूचक पद्धतीने वाहतुकोंडी सोडवण्याच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरु असल्याचं सूचित केलं आहे. या भागातील नागरी प्रश्नांवरुन अशाप्रकारे थेट मुख्यमंत्री आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेवर राजू पाटील यांनी यापूर्वीही अनेकदा टीका केली आहे.

गरोदर बायका, वृध्द, रुग्ण सगळे...

"शीळफाट्याच्या वाहतुककोंडीने स्वतःचेच विक्रम मोडले. मुख्यमंत्री साहेब आपले पुत्र पण येथील लोकप्रतिनिधी आहेत, वाहतुककोंडी सुटावी यासाठी रोज नव्यानव्या ‘स्किम’ घेऊन येतात, त्या स्किम नसतातच,पॅाकेटमनीसाठी केलेला ‘स्कॅम’ असतो अश्या चर्चा ठेकेदार वर्गात सुरू आहेत. गरोदर बायका, वृध्द, रुग्ण सगळे तासनतास ट्रॅफिकला सामोरे जातात तेही आपल्या सुपुत्राच्या मतदारसंघात? महाराष्ट्राने काय अपेक्षा ठेवायच्या? कधीतरी आमच्या सूचनांचा विचार करा, कदाचीत वाहतुककोंडी कमी होईल," असा खोचक सल्ला राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

खोचक ऑफर

अनेकदा या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवरुन आणि शहरांना मिळत असलेल्या निधीवरुन भाजपा आणि श्रीकांत शिंदेंमध्ये होत असलेल्या श्रेयवादाच्या लढाईचा संदर्भही राजू पाटील यांनी खोचकपणे या पोस्टमध्ये दिला आहे. "पाहिजे तर श्रेय तुमच्याच पुत्राला घेऊ द्या पण एकदा आमच्या सूचना ऐकण्यासाठी वेळ द्या व शिळफाट्याच्या ट्रॅफिक जामचा शिक्का तेवढा पुसा," असंही राजू पाटील म्हणाले आहे.

शीळफाट्यावरील वाहतुककोंडी ही मोठी समस्या असून पीक अवर्समध्ये या मार्गाने ये-जा करताना मोठ्याप्रमाणात वाहतुककोंडीला सामोरे जावे लागते.