Navratri 2022 : शक्तीचं प्रतीक असणाऱ्या देवीच्या सर्व रुपांची उपासना आणि विधीवत पूजा करत देवीचं आवाहन करण्याच्या पवित्र पर्वाची आजपासून सुरुवात झाली आहे. देशभरातील देवीच्या बहुसंख्य श्रद्धास्थळांवर शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं उत्साह शिगेला पोहोचला आहे. मुंबईमध्ये मुंबादेवी, महालक्ष्मी या मंदिरांमध्ये सकाळपासूनच मंत्रोच्चार आणि आरतीचे सूर निनादू लागले तर, राज्यातील साडेतीन शक्तीपीठांमध्येही अशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळालं. (shardiya navratri 2022 Ghatasthapana first aarti video tulajabhavani kolhapur ambabai ekvira aai)
कोल्हापूरची अंबाबाई... (Kolhapur Ambabai)
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरात भल्या पहाटे देवीची विधीवत पूजा करुन आरती करण्यात आली. पुढे पावणे नऊ वाजता तोफेच्या सलामीनं मंदिरात घटस्थापना होईल. (Ghatasthapana mahurat) घटस्थापना आणि दरम्यानच्या काळात मंदिर परिसरात होणारी गर्दी पाहता पोलीस यंत्रणाही सज्ज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने देवस्थान समितीच्या वतीने पेड ई पास सुविधेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे मंदिरात ई पेड पास सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी सर्व भक्तांना एकाच दर्शन रांगेतून देवीचं दर्शन दिल जातं आहे.
तुळजाभवानीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापना... (Tulajapur Tulajabhavani)
गेल्या 9 दिवसापासुन मंचकी निद्रा अवस्थेत असलेल्या तुळजा भवानीची आज पहाटे सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. इथं दुपारी घटस्थापनेनंतर शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी देवीच्या मुर्तीची विधीवत पुजा करून देवीला मुळ सिंहासनावर नेण्यात आले.
तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा ही वर्षातुन तिन वेळा असते. तुळजाभवानी देवी ही साडेतीन शक्तीपिठापैकी एक संपुर्ण पिठ असुन एकमेव चल मूर्ती आहे.
#WATCH | Maharashtra: Early morning 'Aarti' being performed at the Mumba Devi Temple in Mumbai on the first day of #Navratri pic.twitter.com/Yx2GUS10BS
— ANI (@ANI) September 26, 2022
एकवीरेच्या चरणांशी भक्तांची गर्दी.... (Karla Ekvira)
नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं लोणावळ्यातील कार्ला एकवीरा मंदिराला असंख्य भाविक भेट देत आहेत. आगरी आणि कोळी समाजाची आराध्य असणाऱ्या आई एकविरेचरणी अनेकजण श्रद्धा अर्पण करत आहेत.