लहान मुलींवर अत्याचार करणारा सापडला

 तब्बल १२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृत तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली.

Updated: Sep 28, 2018, 07:15 PM IST
लहान मुलींवर अत्याचार करणारा सापडला title=

नवी मुंबई : नालासोपारा, नवी मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यातील तब्बल १२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या विकृत तरुणाला अखेर नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आरोपीची सखोल चौकशी केल्यानंतरच त्याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अल्पवयीन मुलींना फूस लावून तसेच वडील आजारी आहेत, असे सांगून हा विकृत तरुण त्यांना निर्जनस्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करत असे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात धुमाकूळ घातल्यानंतर या माथेफिरूने गेल्या १५ दिवसांपासून वसई, नालासोपाऱ्यात उच्छाद मांडला होता. त्यांने दोन मुलींवर अत्याचार केले होते. त्यामुळे पालक चांगलेच धास्तावले होते.

या विकृत तरुणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केले होते. त्यानुसार त्याला अटक करण्यात यश आले आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी बक्षिसही लावले होते. तसेच पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्ज लाऊन सावधानतेचे आवाहन केले होते.