गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली : राज्यात डिजिटल शाळांचं वारं वाहू लागलं आहे. हिंगोली जिल्ह्यात तर 883 पैकी 883 जिल्हा परिषदेच्या शाळा लोकसहभागातून डिजिटल झाल्याचा दावा शिक्षण विभाग करत आहे, मात्र एक शाळा अजूनही झाडाखाली भरते.
झाडाच्या सावलीखाली भरलेली ही शाळा आहे भूवनेश्वर गावातली.. भूवनेश्वर हे गाव काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव सातव यांच्या तालुक्यात येतं.. झाडाच्या सावलीनुसार वर्ग सरकत जातो.. उन्हाळा हिवाळी शाळा अशी भरते तर पावसाळ्यात शाळेला एखाद्या घरकुलाचा आसरा घ्यावा लागतो.. कारण या शाळेला वर्ग खोल्याच नाहीत.
गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा या पत्राच्या शेड मध्ये भरत होती. पण पावसाळ्यात शाळेत चिखल व्हायचा आणि साप, विंचूही निघू लागले.. त्यामुळे शाळा अशी उघड्यावर भरु लागली..
शाळेत चार वर्ग भरतात.. या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक शिक्षक आणि एक मुख्याध्यापक असा दोन लोकांचा स्टाफ आहे. शाळेला इमारतच नसल्याने पालक आपल्या पाल्यांना शाळेतच पाठवत नाहीत.
शिक्षक पोटतिडकीनं पोरांना शिकवतात.. पोरंही गुणी आहेत.. पण उपयोग काय??? या मुलांपर्यंत कोणतीही भौतिक सुविधा पोहोचत नाही.. शाळेला वर्गखोल्या मिळाव्या म्हणून गावक-यांनी भरपूर प्रयत्न केले..मोर्चे काढले, उपषणं केले पण त्यांना जुमानतो कोण???
वर्गात बसण्यची सोय नाही.. जिथं पिण्याच्या पाण्याची सोय नाही तिथं पंखा आणि लाईट म्हणजे चैनिच्याच वस्तू म्हणायच्या.. राज्यात डिजीटल शाळांचं वारं वाहू लागलंय म्हणतात... पण भूवनेश्वर गावातली ही शाळा दुर्गम भागातील शिक्षणाचा खरा आरसा आहे. आता शिक्षणमंत्र्यांनीच शिक्षणाची ही दशा पहावी आणि काय ते प्रतत्न करावे..