मुंबई : शालेय विद्यार्थांना पोषक आहार मिळावा याकरता शाळेत मध्यान्ह भोजन सुरु करण्यात आलं. या पोषण आहारात गेल्या सहा वर्षांत मिळालेल्या धान्याची पोती गोळा करण्याचे आदेश आता शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेल्या सहा वर्षांतली धान्याची पोती आणायची कुठून असा प्रश्न आता शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. नागपूर तालुक्यातल्या बनवाडी या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक आणि कर्मचारी, उन्हाळ्याच्या सुट्टीतही सध्या धान्याची रिकामी पोती शोधत फिरत आहेत. २०१२ ते २०१८ या सहा वर्षांत शाळांना मध्यान्ह भोजनासाठी पुरवण्यात आलेल्या धान्याची रिकामी पोती म्हणजेच बारदाना गोळा करायचा शिक्षण विभागाचा आदेश त्यासाठी कारण ठरलाय. ही पोती लिलावात विकून त्यातून जमा झालेला पैसा शिक्षण विभागाच्या खात्यात चालानद्वारे जमा करायचाय. शिक्षण विभागाच्या या अजब फतव्यामुळे शिक्षक पुरते हैराण झालेत.
२०१२ ते २०१८ या काळात शालेय पोषण आहारांतर्गत मिळालेली पोती जपून ठेवावीत किंवा सरकारला परत करावीत अशा सूचना कधीच देण्यात आल्या नव्हत्या. आधीच वर्गखोल्यांमध्ये धान्य साठवून ठेवण्याची सोय नाही, त्यात ही पोती कुठे ठेवणार? म्हणून सरकारनं हा आदेश मागे घेण्याची मागणी राज्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघाने केली आहे.
कुठल्याही शाळेत सहा वर्षांची पोती साठवून ठेवण्यात आलेला नाहीत. तसंच शिक्षक या पोत्यांची व्यवस्था करू शकत नाहीत याचीही सरकारला पूर्ण कल्पना आहे. तरीही अशा प्रकारचा विचित्र आदेश शिक्षण विभागानं का काढला याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.