मुंबई : विधानसभेचा निकाल लागून १३ दिवस उलटले तरी सत्तेचा तिढा सुटायला तयार नाही. उलट शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर दिवसेंदिवस आक्रमक भूमिका घेताना दिसते आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. एवढंच नव्हे तर राज्यातील राजकारणाचा चेहरा बदलणार असल्याचा टोलाही त्यांनी भाजपला नाव न घेता लगावला. आपण नव्हे तर इतर पक्षही पवारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही भाजपला हाणला आहे.
महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची कोंडी अजूनही कायम आहे. दिल्लीतही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच सत्तेची कोंडी फोडण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने दिली आहे. शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री समसमान मंत्रिपदांचा फॉर्म्युला ऑफर करतील का की दुसरा कोणता मार्ग निवडतील हे येणारा काळच सांगेल.
आज तेराव्या दिवशी तरी युतीतील चर्चा सुरू होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर जाण्याचे दरवाजे खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. काल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शरद पवार आज मुंबईत येणार आहेत. त्यानंतर पुन्हा ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेनंतर पुन्हा दोन दिवसांमध्ये ते पुन्हा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत.
शिवसेनेबरोबर सत्तेत जाण्याचा पर्याय खुला असल्यानेच काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पवारांच्या पुढील खेळीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.