संघर्षाला हवी साथ : माँ जिजाऊंच्या माहेरघरातल्या अंकिताची संघर्षकहाणी

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं माहेरघर असलेल्या बुलढाण्याची सुकन्या असलेल्या अंकिताची ही संघर्षकहाणी...

Updated: Jul 10, 2019, 10:15 PM IST
संघर्षाला हवी साथ : माँ जिजाऊंच्या माहेरघरातल्या अंकिताची संघर्षकहाणी  title=

मयूर निकम, झी २४ तास, बुलढाणा : शेतात मोलमजुरी करणारी आई आणि आजारपणामुळं भाड्याच्या घरातच चॉकलेट बिस्किटं विकणारे वडील... मात्र घरच्या गरिबीवर मात करत बुलढाण्याच्या अंकिता टेकाळेनं दहावीच्या परीक्षेत ९०.८० टक्के गुण मिळवले... राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं माहेरघर असलेल्या बुलढाण्याची सुकन्या असलेल्या अंकिताची ही संघर्षकहाणी...

बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव माळी येथील ही अंकिता सुरेश टेकाळे... भाड्याच्या घरात टेकाळे कुटुंब राहतं. आई राधा दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते तर वडिलांवर शस्त्रक्रिया झाल्यानं ते कामही करू शकत नाहीत. भाड्याच्या खोलीतच ते चॉकलेट बिस्किटांचं किरकोळ दुकान चालवतात.

शनिवारी आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी अंकितादेखील मजुरीसाठी आपल्या आईसोबत शेतात राबायची. अशा हलाखीच्या परिस्थितीवर मात करून अंकितानं दहावीमध्ये ९०.८० टक्के गुण मिळवले.

अंकिताला शिकून इंजिनियर व्हायचंय... पण त्यासाठी लागणारा पैसा उभा करायचा कसा, असा गंभीर प्रश्न अंकिताच्या आईवडिलांना पडलाय.

अंकिताचं इंजिनिअर व्हायचं स्वप्न साकार करण्यासाठी तिच्या आईवडिलांची धडपड सुरू आहेच. पण आपणही तिला मदत करू शकतो... तिला आर्थिक मदत करून...

संघर्षाला हवी साथ

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश मिळवणाऱ्या या गरजू, गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पाठवण्यासाठी थेट त्यांच्याच नावे पुढील पत्त्यावर धनादेश पाठवा

झी २४ तास, मॅरेथॉन फ्युचरेक्स, १४ वा मजला, ए विंग, ना म जोशी मार्ग, लोअर परेल, मुंबई - ४०० ०१३

संपर्क क्रमांक - ९३७२९३७५६९