संजय पवार, झी मीडिया, सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या वरवडे गावची अनिता नंदीवाले... आई फुगे आणि पिना विकते... वडील मिळेल ते काम करतात, आणि अनिता घरकाम करुन उरलेल्या वेळात अभ्यास करते. अशाही परिस्थितीत तिनं दहावीत ९१ टक्के गुण मिळवलेत.
नंदीवाले या भटक्या समाजाच्या महिला फुगे, पिना विकून तर पुरूष मिळेल ते काम करुन पोट भरतात. सोलापूरच्या याच समाजातल्या अनिता नंदिवालेनं मात्र या कामापेक्षा अभ्यासात उज्ज्वल भविष्य असल्याचं जाणलं. तिन कठोर परिश्रम करत दहावीत ९१ टक्के मिळवले. पणतीच्या उजेडात तिनं अभ्यास केला. मिळेल तिथे पाल टाकायचा आणि रहायचं पण मुलीला शिकवायचंच हे वडिलांचं - सायबांना यांचं स्वप्न मुलीनंही साकार करायचं ठरवलंय.
सर्व घरकामं आटोपून वेळ मिळाला की अनिता अभ्यास करायची. दहावीत अनिताला शाळेकडून आदर्श विद्यार्थिनीचा पुरस्कार जाहीर झालेला. मात्र नम्रपणे तो नाकारत तिनं वर्गमैत्रीण नकोशी पवारला पुरस्कार देण्याची विनंती शिक्षकांना केली.
अनिताला जिल्हाधिकारी व्हायचंय. पण फुगे आणि पिना विकून शिक्षणाचा खर्च भागणं अशक्य... म्हणूनच तिला आपल्यासारख्या दानशुरांची मदत हवीय. तिच्या संघर्षाला साथ देऊया...
परिस्थितीशी झगडून, बिकट वाट दिसत असतानाही ज्यांनी संघर्ष करुन अभ्यास केला आणि दहावीला उत्तम गुण मिळवले, अशा विद्यार्थ्यांच्या संघर्ष कहाण्या आम्ही रोज दाखवतोय... या गुणवंतांमध्ये जिद्द आहे, काहीतरी करुन दाखवण्याची ताकद आहे.... अशा गुणवंतांच्या पाठीशी आपण उभं राहायलाच हवं... थोडीशी सामाजिक बांधिलकी आपणही जपायला हवी... त्यासाठीच पुढे या... या गुणवतांना सढळ हातांनी मदत करा, त्यांची स्वप्न पूर्ण करा...
संपर्क क्रमांक : ०२२ - ७१०५५०२६
पत्ता : झी २४ तास, १४ वा मजला,
ए विंग, मॅरेथॉन टॉवर,
लोअर परळ, मुंबई - ४०००१३
ई-मेल : havisaath@gmail.com