Mumbai To Igatpuri Samruddhi Mahamarg: बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग फेब्रुवारीपर्यंत मुंबईच्या आणखी नजीक येणार आहे. इगतपुरीपर्यंत समृद्धी महामार्गाचा एक टप्पा पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) 25 किमी मार्गावरुन वाहतुक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या 25 किमीपर्यंतच्या मार्गावर वाहतूक सुरू झाल्यास या देशातील सर्वात हायटेक हायवे असून मुंबई आणखी जवळ पोहोचणार आहे. समृद्धी महामार्गावरील हा टप्पा सुरु झाल्यानंतर वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
समृद्धी महामार्गावरील हा महत्त्वाचा टप्पा असून या महामार्गामुळं आग्रा हायवे गाठणे सोप्पं होणार आहे. एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी समृद्धी महामार्गावरील 25 किमीचा टप्पा वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर आग्रा हायवेचे अंतर 200 मीटर होणार आहे. यासोबतच जुन्या इगतपुरी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालक आरामात समृद्धी महामार्गापर्यंत पोहोचू शकणार आहेत.
मुंबई ते नागपूरपर्यंतचे अंतर कमी वेळात पूर्ण करण्यासाठी 701 किमी लांबीचा महामार्ग बांधण्यात येत आहे. 11 डिसेंबर 2022मध्ये नागपूर ते शिर्डीपर्यंत 520 किमीच्या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले होते. तर, दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या 80 किमी मार्गही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता तिसऱ्या टप्प्यात भरवीर ते इगतपुरीपर्यंतचा 25 किमी मार्ग वाहनचालकांसाठी सुरू करण्यात येत आहे. 2024अखेर संपूर्ण समृद्धी महामार्ग खुला करण्यात येणार आहे.
या महामार्गावरुन जवळपास 600 किमी मार्गावरुन दररोज जवळपास 25 हजार वाहनांचा प्रवास होत आहे. मुंबईहून दररोज शेकडो साई भक्त याच मार्गावरुन शिर्डी येथे जातात. अशातच इगतपुरीपर्यंत समृद्धी महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते शिर्डीपर्यंतचे अंतर आणखी कमी होणार आहे. तर, हा संपूर्ण महामार्ग खुला झाल्यानंतर मुंबई ते नागपूरचे अंतर पूर्ण करण्यासाठी 7-8 तासांचा अवधी लागणार आहे.
मुंबई आणि नागपुरला जोडणारा समृद्धी महामार्ग गेल्या कित्येक वर्षांपासून निर्माणधीन आहे. या प्रकल्पाचे महत्त्व समजून सरकारने टप्प्या टप्प्यात या महामार्गाचे लोकार्पण करण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन महामार्गाच्या ज्या भागात काम पूर्ण झाले आहे तो खुला करुन वाहतुक सुरू करण्यात येत आहे. यामुळं आर्थिक प्रगती आणि प्रवासही सुखाचा होत आहे. याच अंतर्गंत आता तिसऱ्या टप्प्यात या महामार्गाचे उद्घाटन होत आहे. येत्या काही दिवसांत अंतिम टप्पाही वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी यांच्यातील अंतर कमी करुन प्रवासही आरामदायी होणार आहे.