राजकीय वैमनस्यातून सलूनची तोडफोड

या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.

Updated: Aug 22, 2018, 08:30 AM IST
राजकीय वैमनस्यातून सलूनची तोडफोड title=
संग्रहित आणि प्रतिकात्मक प्रतिमा

रत्नागिरी: राजकीय वैमनस्यातून शिवसेना उप शहर प्रमुखाच्या सलूनची तोडफोड करून मारहाण केल्याची घटना रत्नागिरीत घडली. या घटनेनंतर रत्नागिरी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास इनोव्हासह काही दुचाकीवरून आलेल्या अनोळखी हल्लेखोरांनी शिवसेनेचे उप शहरप्रमुख श्रीकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांच्या दुकानाची तोडफोड केली. तसेच, दुकानात घुसून चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव

घटनेची माहिती मिळताच शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, उद्योजक किरण सामंत यांच्यासह शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. या मारहाणीची तक्रार रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात देण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

शहरात काहीकाळ तणावाचे वातावरण

घटनेची माहिती कळताच रत्नागिरीचे नूतन पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं.