रोहित पवारांचा गोपिचंद पडळकरांवर पलटवार

पडळकरांनी रोहित पवारांवर केली टीका   

Updated: Oct 10, 2020, 03:39 PM IST
रोहित पवारांचा गोपिचंद पडळकरांवर पलटवार  title=

मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार शाब्दिक जुगलबंदी रंगलीय आहे. रोहित पवार यांच्या मतदारसंघातल्या रस्त्यांची दुर्दशा दाखवत पडळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला. शरद पवारांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवारांनी खांद्यावरून खाली उतरून मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे, असा टोला पडळकरांनी लगावला.  तर मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात? असा उलट सवाल रोहित पवारांनी केला आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात याआधी भाजपचाच आमदार असल्यानं मतदारसंघाची दुर्दशा झालीय, याकडं त्यांनी लक्ष वेधलं आहे. 

पडळकरांनी रोहित पवारांवर काय टीका केली?

“गेल्या ५० वर्षांपासून नेतृत्व करत असलेले शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरून कामावर लक्ष द्यावं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,” असं म्हणत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांना टोला लगावला.

तसेच 'रोहित दादा तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा. म्हणचे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल,' अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

तर रोहित पवारांनी काय पलटवार केलाय, पाहा...

माझे मित्र गोपीचंद पडळकर जी माझ्या मतदारसंघातील रस्त्याबाबतचा आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल, असं म्हणत सोशल मीडियावर प्रत्युत्तर दिलं आहे.