रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध

शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यातील लढतीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

Updated: Oct 5, 2019, 09:45 PM IST
रोहित पवारांचा उमेदवारी अर्ज अवैध title=

अहमदनगर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात शनिवारी एक वेगळीच चर्चा रंगली होती. याठिकाणी रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याची माहिती समोर आली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, काहीवेळातच हे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट झाले आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला. 

निवडणुकांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराचे मते फोडण्यासाठी एकसारखे नाव असलेले डमी उमेदवार उभे केले जातात. यालाच अनुसरून रोहित राजेंद्र पवार (रा. पिंपळवाडी ता. पाटोदा, जि. बीड) यांनी कर्जत-जामखेडमधून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, प्रतिज्ञापत्र अपूर्ण असल्याने त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे विरोधकांचा डाव फसला. 

यंदा शरद पवारांचे नातू रोहित राजेंद्र पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यातील लढतीमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रत्येक बारीकसारीक घडामोडींवर राजकीय वर्तुळाचे लक्ष असते. त्यामुळे आज अर्ज बाद ठरलेल्या रोहित राजेंद्र पवारांची चांगलीच चर्चा रंगली होती. सोशल मीडियावरही रोहित पवार यांचाच अर्ज बाद झाल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. मात्र, काहीवेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेल्या रोहित पवार यांचा उमेदवारी अर्ज मात्र मंजूर झाल्याचा खुलासा झाल्यामुळे हा गैरसमज दूर झाला. 

विशेष गोष्ट म्हणजे याच मतदारसंघात राम रंगनाथ शिंदे या अपक्ष उमेदवारानेही अर्ज दाखल केला होता. हा अर्ज मात्र मंजूर झाला आहे.