हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे : मागील अनेक दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे( Raj Thackeray) आणि भाजप यांच्यात जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे. त्यातच अनेक मुद्द्यावरुन राज ठाकरे यांची वेगळीच भूमिका पहायला मिळत आहे. यावरुनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar ) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची भाजप स्टाईल झालेय असा खोचक टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
राज ठाकरे यांची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे. राज ठाकरे यांनी त्यांची ही स्टाईल तशीच ठेवायला पाहिजे. मात्र, मागच्या काही दिवसांपासुन राज ठाकरे स्टाईल कुठं तरी भाजपाची स्टाईल झाल्यासारखं राज्यातल्या जनतेला वाटत असल्याचा चिमटा रोहित पवारांनी राज ठाकरेंना काढला आहे.
राज ठाकरे यांनी स्वत:ची मत ठामपणे मांडावी. महाराष्ट्राच्या हिताची मतं त्यांनी मांडवे. महाराष्ट्राच्या थोर व्यक्ती आणि महाराष्ट्राच्या विचारांचा अवमान झालाय याबद्दल मत व्यक्त करावं अस आवाहनही रोहित पवार यांनी केले आहे.
महाष्ट्राने देशाला दिशा दिली आणि इथं महाराष्ट्राचा वापर इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी केला जात असल्याचा घणाघाती आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
राज्यातल्या युवकांचे भविष्य घडणा-या नोक-या बाहेरच्या राज्यात जात असताना राज्यातील युवकच आपले व्यवसाय बंद ठेवुन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होतील असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या हाकेला रोहित पवारांनी दुजोरा दिला आहे.
राज्यातील रोजगार निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन इतर राज्यात नेला जातोय हीच महाराष्ट्राची आस्मिता टिकविण्यासाठी जे जे करावं लागेल ते करणारच असं म्हणत राज्यातील युवकांनी महाराष्ट्र बंदची साद घातली.
राजकारणात अनेकांनी पवार कुटुंब तोडायचं स्वप्न पाहिलं पण आम्ही एक आहोत असं विधान राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलंय. राजकारणात कुटुंब एक असल्यास तीच खरी ताकद आहे असंही रोहित पवार म्हणाले.