चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या घरी झालेल्या चोरीने पोलिसांची लाजिरवाणी कार्यक्षमता पुढे आली आहे.
चोरीच्या वेळेस डॉ. विशाल हिरे स्वतः रात्र गस्तीसाठी आपल्या कार्यक्षेत्रात होते... आणि इकडे या शहरातील पंचायत समितीमागील परिसरात चोरटयांनी चार घरांत शिरून मोठा ऐवज लंपास केला.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, साहेब जेव्हा सकाळी घरी पोचले तेव्हा त्यांच्या लक्षात हा प्रकार आला... आणि त्यांनाही सामान्य माणसासारखे पोलीस ठाण्यात फोन लावून पोलिसांना बोलवावे लागले.
पोलीस गस्तीवर आणि चोरटे पोलिसांच्या घरी असा हा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला असून या चोरीत १५ हजार रोख रक्कम लांबविल्याची तक्रार साहेबानी नोंदविली आहे.
हद्द आपली, चोरी रोखण्याचे आव्हान आपले आणि चोरीदेखील आपल्याच घरी अशी विचित्र स्थिती सध्या डॉ. साहेबांवर ओढविली आहे. पोलिसी अकार्यक्षमतेच्या या लाजिरवाण्या घटनेने मूल पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.