राज्यात रस्ते अपघात वाढले, १० महिन्यात १० हजार लोकांचा मृत्यू

राज्यात वाहनांची संख्या वाढली तसे वाहनांचे अपघातही वाढले आहेत.

Updated: Dec 8, 2019, 08:03 PM IST
राज्यात रस्ते अपघात वाढले, १० महिन्यात १० हजार लोकांचा मृत्यू title=

पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : राज्यात वाहनांची संख्या वाढली तसे वाहनांचे अपघातही वाढले आहेत. राज्यातल्या अपघातांचं आणि अपघातातल्या मृत्यूचं प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. दररोज येणाऱ्या भीषण अपघातांच्या बातम्या काही केल्या थांबत नाहीत. गेल्या दहा महिन्यात राज्यात तब्बल २७ हजार ३३८ अपघात झाले आहे. या अपघातांमध्ये तब्बल १० हजार २७२ जणांचा बळी गेला आहे. त्याअगोदर २०१८ मध्ये ३५ हजार ७१७ अपघात झाले त्यात १३ हजार २६१ जणांचा मृत्यू झाला. तर २०१७ मध्ये ३६ हजार ५६ अपघात झाले त्यात १२ हजार ५११ नागरिकांचा बळी गेला. 

गेल्या दहा महिन्य़ातल्या अपघातांची सरासरी काढल्यास दर महिन्याला राज्यातल्या एक हजार निष्पाप नागरिकांचा अपघातात बळी जातो आहे. रस्ते अपघात आणि विमान अपघातांची तुलना केल्यास रस्ते अपघातातल्या बळींची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळं रस्ते प्रवास, विमान प्रवासापेक्षा अधिक असुरक्षित असल्याचं अधोरेखित झालं आहे.

रस्ते अपघात का होतात याची कारणं शोधली असता काही ठरविकच कारणं समोर येतात. अतिवेगामुळे अपघात होतात. ओव्हरटेक करण्य़ाच्या प्रयत्नातही अपघात होतात. दारु पिऊन वाहन चालवल्यानंही होणाऱ्या अपघातांची संख्या मोठी आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्यानेही अपघात होतात. वाहन चालवताना वेगावर आणि मनावर नियंत्रण असणं गरजेचं आहे. नाहीतर रस्ते अपघातांमध्ये एक पिढीचं मोठं नुकसान होईल यात शंका नाही.