पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोची कामे जलदगतीने सुरु आहेत. मात्र याच कामामुळे नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतोय. अशाच एका घटनेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाला जबरदस्त अपघात झाला. ही रिक्षा महामेट्रोने उभारलेल्या बॅरिकेट्सला जाऊन धडकली. दरम्यान, दुसऱ्या रिक्षाची बाजू काढण्याच्या नादात रिक्षाला अपघात झाला. मात्र, रिक्षात लहान मुले होती, याचा विसर रिक्षा चालकाला पडल्याचे दिसून येत आहे.
कासारवाडी परिसरातल्या या अपघाताची दृश्यं सीसीटीव्हीत चित्रीत झालीत. या अपघातात रिक्षातून प्रवास करणारे दोन विद्यार्थी जखमी झालेत. अपघातातील विद्यार्थी खडकीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती मिळतेय. दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या ह्या अपघाताच्या वेळी रस्त्यावर मोठी वर्दळ होती त्यामुळे अपघातग्रस्त रिक्षाला नागरिकांनी त्वरित उभं करून त्या खालील अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलं आणि मोठा अनर्थ टळला. मात्र ह्या घटनेमुळे पिंपरी शहरातील शालेय विद्यार्थ्यांची रिक्षातुन होणारी अवैध वाहतूक आणि मेट्रोच्या कामाचा परिणाम अधोरेखित झालाय.