शालेय साहित्य ऑनलाईन खरेदी करताय अगोदर हे वाचा

बोगस अॅप तयार करून पालकांची केली जात आहे फसवणूक 

Updated: Aug 24, 2022, 01:00 PM IST
शालेय साहित्य ऑनलाईन खरेदी करताय अगोदर हे वाचा  title=
प्रतीकात्मक फोटो

सोनू भिडे, नाशिक:  

झटपट पैसे मिळत असल्याने गुन्हेगार सध्या ऑनलाईन (Online) गुन्ह्याकडे वळले आहे. पैसा सहज मिळत असल्याने या गुन्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. गुन्हेगारही यात नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांना फसवत आहेत. शालेय साहित्याचे बोगस अॅप (Bogus App) तयार करून पालकांची फसवणूक केल्याच्या सुमारे दोन हजार तक्रारी सायबर पोलिसांना (Cyber police) प्राप्त झाल्या आहेत.

अशी होतेय फसवणूक

जुलै महिना म्हणजे शाळा आणि महाविद्यालयातील प्रवेश मिळविण्याची घाई. या महिन्यात शालेय साहित्य खरेदीची लगबग सुरु असते. ऑनलाईन अॅपवर शालेय साहित्यावर मोठी सूट दिली जाते. हि सुट मिळविण्यासाठी पालक ऑनलाईन (Online) खरेदी करतात. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला आहे. शालेय साहित्य मिळण्याचे अनेक बोगस अॅप (App) तयार करण्यात आले आहेत. या अॅपवर शालेय साहित्याची मागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे बँक खाते हॅक करून खात्यातील रक्कम ऑनलाईन वर्ग केल्याच्या तक्रारी घडल्या आहेत.

ऑनलाईन खरेदी करताना घ्या हि काळजी

ऑनलाईन खरेदी करताना अधिकृत वेबसाईट वरून साहित्य खरेदी करावे.

आपल्या बँकेच्या अकाउंट बद्दल कोणालाही माहिती शेअर करू नका.

अॅपचा पासवर्ड नेहमी बदलत राहणे गरजेचे आहे.

वस्तू खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरी हा पर्याय निवडावा

पैसे देण्यासाठी QR कोड पाठविल्यास सतर्क राहावे या QR कोडमुळे बँकेची माहिती गुन्हेगारांना सहज प्राप्त होऊन बँक खाते रिकामे होऊ शकते.

खात्री झाल्याशिवाय कोणतीही लिंक ओपन करू नये.