मुंबई : गुजरात किनाऱ्यावर चक्रीवादळ (Cyclone) धडकण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, 'ऑरेंज अॅलर्ट'चाही इशारा देण्यात आला आहे.
अरबी समुद्राच्या आग्नेय भाग आणि शेजारील लक्षद्वीप भागामध्ये कमी दाबाचा पट्टा होण्याची शक्यता आहे. याची तीव्रता अधिक वाढून दि. 15 तारखेपर्यंत हे क्षेत्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होऊन 18 मेच्या संध्याकाळपर्यंत ते गुजरात किनारपट्टीजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या घडामोडी लक्षात घेता आता महाराष्ट्रासाठी इशाऱ्याची तीव्रता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अद्ययावत पूर्वानुमानानुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी तसेच पुणे जिल्ह्याला सोमवारसाठी 'ऑरेंज अॅलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. येणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
16 आणि 17 मे रोजी राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडेल. तर काही ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईमध्येही सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारीही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकणात शनिवारीही पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही शनिवारपासून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याचा अंदाज आहे.
मुंबई, ठाण्यामध्ये रविवारी पावसाचा जोर थोडा कमी असेल. मात्र सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी पावसाचा जोर कमी असेल. मात्र सोमवारी घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा येथे रविवारी आणि सोमवारी घाट परिसरामध्ये काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भागामध्ये काही मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. विदर्भातही पावसाचा जोर मात्र रविवारपासून थोडा वाढू शकतो. अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.