प्रथमेश तावडे, झी २४ तास, वसई : रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांचा अंदाज सर्वांना माहित आहे. आठवले यांचे सभागृहातले भाषण असो किंवा मग निवडणुकीतल्या सभा यात त्यांच्या कवितांमुळे उपस्थितांमध्ये हाशा पिकतो. मात्र रामदास आठवले यांचा वसईतील एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. या व्हिडीओमध्ये आठवले यांनी चक्क कार्यकर्त्याच्या तोंडात चाकू घातल्याचे दिसत. जेव्हा चाकू तोंडात घातला तेव्हा उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.
बुधवारी वसईत रिपाईंतर्फे ( RPI) संयुक्त जयंती कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पक्षाचा कार्यक्रम असल्याने रामदास आठवले यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम सुरु होता. सर्वांची भाषणं संपत आली होती. तेव्हा उपस्थिती कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं की, आज (बुधवारी) RPI चे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे यांचा वाढदिवस आहे. लगेच कार्यकर्त्यांनी केकचं आयोजन केलं. आठवले साहेबांच्या उपस्थित वाढदिवस साजरा होतोय याचा धुळे यांना आनंद होता.
संयुक्त जयंती आणि कार्यकर्ता मेळावा संपत आला. तोच बाकीच्या कार्यकर्त्यांनी मंचावर केक आणला. आठवले साहेब आणि ईश्वर धुळे (Ishwar Dhule) शेजारी उभे राहिले. धुळे यांनी केकवर लावलेली मेनबत्ती फुंकली. केक कापला. सर्वांनी "हॅप्पी बर्थ डे टू यू..." म्हणत धुळे यांना शुभेच्छा दिल्या. (Happy Birthday To you )
केक भरवण्यासाठी आठवलेसाहेब पुढे सरसावले. केक कापण्याचा चाकून आठवलेंनी धुळे यांच्या हातातून घेतला. केकचा तुकडा चाकूवर घेतला आणि तोच चाकू ईश्वर धुळे यांच्या तोंडात घातला. या प्रकारानंतर दूरवर बसलेल्या कार्यकर्त्यांच्या भुवया उचावल्या त्यांना वाटलं आठवले हे काय करत आहेत. मात्र तो चाकू हा प्लास्टिकचा होता त्यामुळे आठवले साहेबांनी भरवलेला प्रेमाचा केक बाईट धुळे यांच्या कायम लक्षात राहिला.
भोंग्याच्या मुद्द्यावरुन देशात राजकारण तापलं आहे. अशात रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांना थेट देशातून चालते व्हा असं सांगून टाकलं. रामदास आठवले यांनी कार्यक्रमात संविधानाचा दाखला दिला. आठवले म्हणाले की, "बाबासाहेबांनी लिहलेलं संविधान सर्वांना एकत्र ठेवणारं आहे. भोंगेवाले आणि सोंगेवाले यांना एकत्र आणणारे संविधान आहे. त्यामुळे कुणी फाटाफूट करत असेल तर याद राखा. बाबासाहेबांचे संविधान मान्य नसेल तर देशातून चालते व्हा..." अशी टीका रामदास आठवले यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता केली.