'आपल्यासारख्या महाराष्ट्र पुत्राने राज्याची प्रतिमा...' आरोग्यमंत्र्यांचा प्रकाश जावडेकरांना टोला

प्रकाश जावडेकरांच्या टीकेला राजेश टोपेंचे उत्तर

Updated: Apr 9, 2021, 10:17 AM IST
'आपल्यासारख्या महाराष्ट्र पुत्राने राज्याची प्रतिमा...' आरोग्यमंत्र्यांचा प्रकाश जावडेकरांना टोला  title=

मुंबई : केंद्र सरकारतर्फे लसीकरण वाटप करताना महाराष्ट्राशी कसा दुजाभाव केला जातो याची आकडेवारी राज्य सरकारने समोर आणली. त्यानंतर प्रकाश जावडेकरांनी (Prakash Jawadekar) ट्वीट करुन महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये असे ट्वीट केले. याला आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी उत्तर दिलंय.

काय म्हणाले जावडेकर ? 

महाराष्ट्र सरकारने लसीकरणाबाबत राजकारण करु नये. आजच्या तारखेपर्यंत 1 कोटी 6 लाख19 हजार 190 लसी महाराष्ट्राला पोहोचल्या. यातील 90 लाख 53 हजार 523 लसी वापरण्यात आल्या. 6 टक्के लस फुकट गेली. 7 लाख 43 हजार 280 लस पाईपलाईनमध्ये आहे. साधारण 23 लाख लस उपलब्ध असल्याच आकडेवारी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

टोपेंचे उत्तर 

लसीकरणावरून महाराष्ट्र शासन राजकारण करीत नाहीये. याउलट लस वाया जाण्याची जी राष्ट्रीय सरासरी आहे ती आपण महाराष्ट्राच्या नावावर खपवताय असा टोला टोपेंनी लगावला. आपल्या राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे असे ते म्हणाले. 

आपल्यासारखा महाराष्ट्राचा सुपुत्र राज्याची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेईल ही अपेक्षा टोपेंनी व्यक्त केली. 

आकडेवारी 

राज्यात परवा 56286 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आणि काल नवीन 36130 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2649757 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात  एकूण 521317 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.05% झाले आहे.

राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर इंजेक्शनचे उत्पादन करणाऱ्या सात कंपन्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची  काल बैठक घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत कोरोना आढाव्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते.  महाराष्ट्र कोरोना विरुद्धच्या लढाईत कुठेही मागे नव्हता आणि नाही हे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले. 

या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये असे देशातील सर्वपक्षीय नेत्यांना पंतप्रधानांनी आवाहन करावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येत आहेत असा विश्वास दिला. तसेच लसीचा जादा पुरवठा करावा. इतर राज्यांतून ऑक्सिजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली.