पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट नवनिर्माण सेनेची औरंगाबाद येथील सभा उद्या संपन्न होत आहे. या सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कालपासून पुण्यात 'राज महल' या निवासस्थानी दाखल झाले होते.
आज राज ठाकरे पुणे येथून औरंगाबादला रवाना होत आहेत. मात्र, तत्पूर्वी या हिंदू जननायकाला पुण्यातील पुरोहितांनी 'राज'तिलक लावून आशीर्वाद दिला.
पुण्यात दाखल झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आशीर्वाद देण्यासाठी आज सकाळी तब्बल १०० हुन अधिक पुरोहित राजमहाल निवासस्थानी आले होते. या पुरोहितांनी शंख वाजवून ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही मंत्रांचे वेदपठण केले.
या मंत्राचे वेदपठण सुरु असताना राज ठाकरे यांनी महाआरती केली. सुमारे १५ मिनिटे वेदमंत्रांचे पठण सुरु होते. या महाआरतीनंतर मुख्य पुरोहितांनी राज ठाकरे यांच्या कपाळी कुंकुम तिलक लावत त्यांच्या औरंगाबाद येथील सभेसाठी शुभाशीर्वाद दिले.
हा 'राज'तिलक आशीर्वाद सोहळा संपल्यानंतर राज ठाकरे वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. तिथूनच ते पुढे औरंगाबादला मार्गस्थ होणार आहेत.